08 March 2021

News Flash

स्वस्त कर्ज पर्व सुरू!

स्टेट बँकेने तिचा कर्ज व्याज दर ०.१५ टक्क्य़ाने कमी करत तो ९.१० टक्क्य़ांवर आणून ठेवला आहे.

ब्रिटिश एअरवेजच्या BA198 विमानाने मुंबई ते लंडन प्रवास करताना विमानात धूर निघाल्याने हे विमान अजरबैजानच्या बाकू विमानतळावर उतरवण्यात आले.

एचडीएफसी बँकेची स्टेट बँकेवर मात; पतधोरणापूर्वीच व्याजदर कपात धडाका

रिझव्‍‌र्ह बँकेच्या नव्या वित्त वर्षांतील पहिल्या पतधोरणाच्या बैठका सुरू होण्यास दिवसाचा अवधी असतानाच व्यापारी बँकांनी त्यांचे विविध कर्जावरील व्याजदर प्रतिक्षा संपुष्टात आणत आधीच कमी करण्यास सुरुवात केली आहे. याची सुरुवात देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेने सोमवारी केली. तर क्षेत्रात किमान व्याज दर निश्चित करत खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने घटप्रमाण विस्तारतानाच याबाबत स्टेट बँकेलाही मागे टाकले आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या संभाव्य व्याजदर कपातीपूर्वी प्रमुख बँकांनी सोमवारी उचलेल्या पावलांमुळे गृह, वाहन, शिक्षण आदी कर्जदारांचा मासिक हप्त्याचा भार काहीसा हलका होणार आहे.

स्टेट बँकेने तिचा कर्ज व्याज दर ०.१५ टक्क्य़ाने कमी करत तो ९.१० टक्क्य़ांवर आणून ठेवला आहे. पूर्वी हा दर ९.२५ टक्के होता. नव्या दराची अंमलबजावणी १ एप्रिलपासूनच सुरू झाली आहे. स्टेट बँकेने तिचा आधार दर ०.०५ टक्क्य़ाने कमी करत तो ९.२५ टक्के केला आहे. तसेच प्राधान्य आधार दर १४ टक्क्य़ांवरून १३.८५ टक्के केला आहे. तसेच एचडीएफसी बँकेने हे प्रमाण एकाच फटक्यात तब्बल ०.२५ टक्क्य़ाने खाली आणत व्याज दर वार्षिक ९ टक्के केला आहे.

स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँकांचा तसेच भारतीय महिला बँकेच्या मुख्य बँकेच्या अखत्यारितील कारभार शनिवार,  १ एप्रिलपासूनच सुरू झाला आहे. यानंतर बँकेच्या नावाच्या रूप तसेच रंगातही किरकोळ बदल करण्यात आले आहेत.

बचत खात्यावरील किमान शिलकीवर शुल्क आकारणी सुरू

अन्य बँकांप्रमाणे बचत खात्यावरील किमान शिलकीवर शुल्क न आकारणाऱ्या स्टेट बँकेनेही अखेर विविध सेवांची शुल्क आकारणी सुरू केली आहे. स्टेट बँकेच्या सहा विविध महानगरातील खातेदारांसाठी बचत खात्यातील किमान रक्कम ५,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर किमान शिल्लक न ठेवणाऱ्या खातेदारांना २० रुपयांपासून (ग्रामीण शाखा) ते १०० रुपयांपर्यंत (शहरी भागातील शाखा) शुल्क लागू करण्यात आले आहे. ३१ मार्चपर्यंत स्टेट बँकेची किमान सरासरी शिल्लक मर्यादा ५०० रुपये (धनादेश पुस्तिका नसलेल्यांसाठी) व १,००० रुपये (धनादेश पुस्तिका घेणाऱ्यांकरिता) होती. १ एप्रिलपासून लागू झालेल्या नव्या शुल्काची अंमलबजावणी सुरभी, मूळ बचत बँक आणि पंतप्रधान जन धन योजना खात्यांकरिता नसेल.

बुडीत कर्जाचा भार वाढणार नाही

पाच सहयोगी बँका व एका महिला बँकेच्या विलिनीकरणामुळे मुख्य स्टटे बँकेच्या बुडीत कर्जावरील भार अधिक वाढणार नाही, असे अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले आहे. स्टेट बँकेसह विलीन होणाऱ्या बँकांच्या मालमत्ता गुणवत्तेचा आढावा घेण्यात येत असून रिझव्‍‌र्ह बँकेच्या देखरेखीखाली सर्व प्रक्रिया पार पाडून आर्थिक बाबतीतही उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

रिझव्‍‌र्ह बँकेची दरनिश्चिती बैठक

व्याजदर निश्चित करणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीची दोन दिवसांची बैठक चालू आठवडय़ात होत आहे. यापूर्वी ८ फेब्रुवारी रोजी रिझव्‍‌र्ह बँकेने पतधोरण आढावा घेताना प्रमुख दर स्थिर ठेवले होते. महागाई, विकास दर तसेच निश्चलनीकरणाचा परिणामावर नजर ठेवून दर ६.२५ टक्के कायम ठेवण्यात येत असल्याचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी म्हटले होते.

डेप्युटी गव्हर्नर बी.पी.कांगो रुजू

रिझव्‍‌र्ह बँकेचे नवे डेप्युटी गव्हर्नर म्हणून बी. पी. कांगो सोमवारपासून रुजू झाले. मध्यवर्ती बँकेत कार्यकारी संचालक असलेले कांगो यांची नियुक्ती ११ मार्च रोजी जाहीर झाली होती. नवी नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल. रिझव्‍‌र्ह बँकेत त्यांच्याकडे चलन व्यवस्थापन, विदेशी विनिमय विभागाचा कार्यभार असेल. आर. गांधी यांच्या निवृत्तीनंतर अंतर्गत रचनेतून नियुक्त करावयाचे एक डेप्युटी गव्हर्नर म्हणून कांगो यांची निवड झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 2:07 am

Web Title: loans interest rate
Next Stories
1 आठवडय़ाची मुलाखत : सौरऊर्जेद्वारे वीज देयकात घट शक्य
2 आता केवळ एक पानाचे ‘सहज’ प्राप्तिकर विवरणपत्र
3 अल्पबचत योजनांच्या व्याजदरात एकदशांश टक्क्य़ांची कपात
Just Now!
X