सुतार, वाहन चालक, नळ कारागीर, इलेक्ट्रिशिअन, मेकॅनिक, तंत्रज्ञ, फेरीवाले  विक्रेते, शिपाई ते सुरक्षारक्षक अशा अल्पवेतनी तसेच नियमित उत्पन्न नसलेले छोटे कारगीर अथवा स्वयंरोजगार करणाऱ्यांना स्वमालकीच्या घर आता घेता येईल. ‘अनौपचारिक उत्पन्न श्रेणीत’ मोडणाऱ्या या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ‘स्वराज’ अंतर्गत विशेष गृह कर्ज योजना आयआयएफएल होम फायनान्स या कंपनीने सादर केली आहे.

स्वराज अंतर्गत २ लाख रुपये ते २० लाख रुपयांपर्यंतचे गृह कर्ज दिले जाईल आणि परवडणाऱ्या घरांसाठी ही गृहवित्त योजना आहे. उत्पन्न दर्शविणारी औपचारिक कागदपत्रे (वेतन पत्रक) उपलब्ध नसलेल्या आणि पहिल्यांदाच कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळवीत असणाऱ्या घर खरेदीस इच्छुक ग्राहकांच्या गरजा ध्यानात घेऊन ‘स्वराज’ची रचना करण्यात आली आहे, असे आयआयएफएल होम फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोनू रात्रा यांनी सांगितले.

कार्यक्षम जोखीम व अनुपालन मूल्यमापनाद्वारे पात्र अर्जदारांना कंपनी कर्जे देते आणि त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी  मदत करते. असंघटित क्षेत्रातील अल्पवेतनी, निम-कुशल कामगारांना कर्जे मिळण्यासाठी स्वराज सेवा देते. स्वराजचा लाभ दुकानदार, व्यापारी व कंत्राटदार यांनाही घेता येऊ शकतो, असे ते म्हणाले.