News Flash

‘लोकसत्ता अर्थब्रह्म’चे दिमाखदार प्रकाशन

लक्ष्याला सुसंगत गुंतवणूकच आकर्षक परतावा देऊ शकते

‘लोकसत्ता अर्थब्रह्म’चे दिमाखदार प्रकाशन
‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या चौथ्या वार्षिकांकाच्या प्रकाशनानिमित्त आयोजित गुंतवणूक जागरात तज्ज्ञ सल्लागारांनी मार्गदर्शन केले. (डावीकडून) प्रवीण देशपांडे, अजय वाळिंबे, तृप्ती राणे यांच्यासह, बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे निधी व्यवस्थापक महेश पाटील यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले आणि उपस्थित गुंतवणूकदारांच्या प्रश्नांचे निरसनही केले.

लक्ष्याला सुसंगत गुंतवणूकच आकर्षक परतावा देऊ शकते, केवळ कर वाचविण्यासाठी कर वाचविण्याठी गुंतवणूक मुळीच नसावी, भांडवली बाजारातील व्यवहारासाठी स्व-अभ्यास महत्त्वाचा तसेच महागाईचा सामना करण्याची क्षमता असलेली गुंतवणूक असावी, अशी चतु:सूत्री तज्ज्ञ आर्थिक सल्लागारांनी ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या मंचावरून मंगळवारी मुंबईत दिली.

‘बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत व गजराज बिल्डर्स, वास्तू रविराज सहप्रायोजकत्व लाभलेल्या ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या चौथ्या वार्षिकांकाचे प्रकाशन तज्ज्ञ तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. पॉवर्ड बाय पार्टनर एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, केसरी टुर्स, पुराणिक बिल्डर्स व जनकल्याण सहकारी बँक बँकिंग पार्टनर असलेल्या या कार्यक्रमासाठी  गुंतवणूकदारांनी मोठी गर्दी केली होती.

‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या २०१७-१८ साठीच्या वार्षिकांकाचे प्रकाशन बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडचे सह मुख्य गुंतवणूक अधिकारी महेश पाटील, केसरी टुर्सचे प्रमोद दळवी, गजराज बिल्डर्सचे विजय पाटील, वास्तू रविराजचे रविराज अहिरराव, जनकल्याण सहकारी बँकेचे अतुल धर्मे यांच्या हस्ते झाले. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ उपक्रमाची उकल या वेळी केली. नवीन वित्त वर्षांच्या अर्थसंकल्पानंतरची आर्थिक गणिते सोडविणाऱ्या तसेच गुंतवणूकविषयक महत्त्वाच्या बदलत्या तरतुदींवर प्रकाश टाकणाऱ्या या वार्षिकांक प्रकाशनानंतर प्रत्यक्ष गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करणारे सत्र या वेळी पार पडले. भांडवली बाजारातील गुंतवणूक, कुटुंबाचे अर्थनियोजन, गुंतवणुकीबरोबरच करबचतही महत्त्वाचीच या विषयानुरूप अनुक्रमे अजय वाळिंबे, तृप्ती राणे व प्रवीण देशपांडे या तज्ज्ञ अर्थ जाणकारांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’चे महेश पाटील यांनी एकूणच फंड उद्योग, फंड योजना, त्यातील गुंतवणूक व परतावा तसेच भविष्यातील धोरण असा सखोल आढावा आपल्या सविस्तर भाषणात घेतला.

गुंतवणुकीबाबत तज्ज्ञ सल्लागारांची चतु:सूत्री..

  • लक्ष्याधारीत गुंतवणूकच फलदायी तृप्ती राणे

वयाच्या विविध टप्प्यांतील गुंतवणुकीचे नियोजन विशद करण्यासह पारंपरिक गुंतवणूक पर्यायाबरोबरच अधिक परतावा देणाऱ्या गुंतवणूक माध्यमाकडे वळण्याची गरज या वेळी सनदी लेखाकार तृप्ती राणे यांनी व्यक्त केली. तरुण, कमावत्या वयात म्युच्युअल फंड तसेच स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीबाबत काय धोरण असावे हे स्पष्ट करत त्यांनी या वेळी उदाहरणाद्वारे त्या त्या वयात भर द्यावयाच्या गुंतवणुकीचे मार्ग विशद केले. गुंतवणुकीपूर्वी सर्व माहिती पारखून, त्याबाबतच्या संकल्पना स्पष्ट करून आपले गुंतवणूक धोरण सुसंगत ठेवले तरच त्यातून अधिक परतावा मिळू शकतो.

  • कर वाचविण्यासाठी गुंतवणूक मुळीच नसावी प्रवीण देशपांडे

कर पद्धतीची सुसूत्रित मांडणी करत विविध कर संकल्पना या वेळी कर सल्लागार प्रवीण देशपांडे यांनी स्पष्ट केल्या. भारतातील कररचनेची जागतिक स्तराशी तुलना करण्याबरोबरच कर संकलनाची सरकारची प्रक्रिया व करदात्याचे कर्तव्य आदींचाही ऊहापोह त्यांनी या वेळी केला. अर्थसकंल्पाच्या रूपात दर वर्षी बदलणाऱ्या कर रचनेबाबत जाणकार राहण्यासह करविषयक तरतुदींची माहिती प्रत्येक करदात्याने ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. कर नियोजन न केल्याचे तोटेही त्यांनी अधोरेखित केले. कर वाचविण्यासाठी कर नियोजन करावे, ही संकल्पना चुकीचीच.

  • शेअर व्यवहारासाठी स्व-अभ्यास आवश्यकच  – अजय वाळिंबे

भांडवली बाजार व नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पाचा संबंध जोडताना बाजार विश्लेषक अजय वाळिंबे यांनी बाजाराशी संबंधित अर्थसंकल्पातील तरतुदींविषयी भाष्य केले. कंपन्या, त्यांचे समभाग याबाबत त्यांनी भांडवली बाजाराचा गेल्या काही वर्षांचा आढावा या वेळी घेतला. बाजारातील व्यवहाराबाबत गुंतवणूकदाराची जोखीम स्वीकारण्याची तयारी असावी, असे ते म्हणाले. भांडवली बाजाराबाबत मार्गदर्शक म्हणून कोणीही तज्ज्ञ नसतो, असे स्पष्ट करत या माध्यमातून गुंतवणूक करावयाची असल्यास प्रत्येकाने कंपनी, समभाग याबाबत स्वत: अभ्यास आवश्यकच!

  • गुंतवणुकीतून महागाईवर मात असावी – महेश पाटील

जागतिक अर्थव्यवस्था, देशांतर्गत स्थितीचे वर्णन करण्यासह त्याचा भांडवली बाजार – म्युच्युअल फंड क्षेत्रावरील परिणाम या वेळी बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडचे सह मुख्य गुंतवणूक अधिकारी महेश पाटील यांनी विशद केला. गेल्या दोन ते तीन वर्षांतील आर्थिक स्थिती आता जागतिक तसेच भारताबाबतही स्थिरावत असून येणारा कालावधी उज्ज्वल भविष्याचा असल्याचे ते म्हणाले. बाजार व फंडांच्या दृष्टीने काही सकारात्मक बाबींचा त्यांनी या वेळी उल्लेख केला. कोणत्याही गुंतवणूकदाराने आपली गुंतवणूक ही वाढत्या महागाईचा सामना करणारी आहे का, याचा विचार करूनच ती करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2017 1:47 am

Web Title: loksatta arth brahma 8
Next Stories
1 सहाराला ५,०९२.६ कोटी जमा करण्याचे न्यायालयाचे आदेश
2 आभासी चलन आर्थिक जोखमीचे ठरू शकते
3 वाहन उद्योगही निश्चलनीकरणाच्या गर्तेतून बाहेर
Just Now!
X