महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ मार्गदर्शन

मुंबई : उपलब्ध उत्पन्न आणि कुटुंबाचा खर्च यांचा मेळ राखणे महागाईच्या वाढत्या वेगामुळे शक्य होत नाही. त्यावर अधिकाधिक बचत, नियोजनबद्ध गुंतवणूक हाच उपाय आहे. हे गुंतवणुकीचे मार्ग कोणते याबद्दल येत्या मंगळवारी महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी अर्थात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ‘लोकसत्ता’च्या पुढाकाराने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

म्युच्युअल फंडविषयक जनजागृती व प्रसार करणाऱ्या ‘म्युच्युअल फंड सही आहे’ प्रस्तुत आणि  ‘सीडीएसएल’ सहप्रायोजक असलेले हे ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ मार्गदर्शन मंगळवार, २८ मे २०१९ रोजी दुपारी ३ वाजता, महाजेन्कोचे वांद्रेस्थित मुख्यालय – प्रकाशगडच्या सहाव्या मजल्यावरील प्रेक्षागृहात योजले आहे. दरमहा वेतनरूपाने मिळणाऱ्या उत्पन्नातून खर्च वजा जाता उरणाऱ्या पैशाला गुंतवणूक ऊर्जेतून बळ देऊन पाहिलेली आर्थिक स्वप्ने साकारता येऊ शकतात.

हा कार्यक्रम केवळ महाजेन्कोच्या कर्मचाऱ्यांसाठीच असून यानिमित्ताने त्यांना त्यांच्या गुंतवणूकविषयक शंकांचे निरसन करण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून काही जागा निमंत्रितांकरिता राखीव आहेत.

‘अ‍ॅम्फी’चे पदाधिकारी आणि रिलायन्स म्युच्युअल फंडाचे विपणनप्रमुख संदीप वाळुंज हे या वेळी ‘म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे मर्म’ उलगडवून दाखवतील. तर ‘सीडीएसएल’च्या आर्थिक साक्षरता विभागाचे प्रमुख अजित मंजुरे हे ‘डीमॅटचे लाभ’ विशद करतील. म्युच्युअल फंड आणि समभाग गुंतवणुकीबाबत परतावा, जोखीम, शिस्त यांचे तंत्र या वेळी तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात येईल.

मंगळवार, २८ मे २०१९

दुपारी ३.०० वाजता

प्रकाशगड प्रेक्षागृह, सहावा मजला, प्रकाशगड इमारत, वांद्रे

वक्ते : संदीप वाळुंज (अ‍ॅम्फी) अजित मंजुरे (सीडीएसएल)

Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.