मुलुंडमध्ये आज ‘लोकसत्ता अर्थभान’

मुंबई : बँकांच्या मुदत ठेवी, भविष्य निर्वाह निधी, पोस्टाच्या बचत योजना यासारखे स्थिर उत्पन्न देणारे पर्याय किंवा भांडवली बाजार, मौल्यवान धातू, स्थावर मालमत्ता अशी जोखमीच्या गुंतवणूक माध्यमांची भाऊगर्दी असताना योग्य मार्ग कोणता? कोणत्या गुंतवणूक प्रकाराला किती झुकते माप द्यावे? या सामान्य गुंतवणूकदारांच्या प्रश्नांची उत्तरे शनिवारी मुलुंडमध्ये मिळणार आहेत.

‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थभान’ उपक्रमाच्या नव्या पर्वात ही संधी मुलुंडकरांसाठी पहिल्या टप्प्यात उपलब्ध होत आहे. गुंतवणूकदारांना त्यांच्या शंकांचे निरसन करण्याची संधी यानिमित्ताने मिळेल. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आहे, तर काही जागा निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

शनिवारी, १६ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ६.०० वाजता मराठा मंडळ सभागृह, वासुदेव बळवंत फडके मार्ग, केळकर महाविद्यालयाजवळ, मुलुंड (पूर्व) येथे होणाऱ्या या कार्यक्रमात आर्थिक सल्लागार तृप्ती राणे व अर्थशास्त्राचे प्राध्यापक कौस्तुभ जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत.

‘म्युच्युअल फंड आणि गुंतवणुकीचा मेळ’ स्पष्ट करताना तृप्ती राणे या एकूणच फंड गुंतवणूक प्रकाराची माहिती, त्यातील प्रकार, परताव्याविषयी मार्गदर्शन करतील. तर ‘अर्थनियोजनाचे महत्त्व’ विशद करताना कौस्तुभ जोशी हे पारंपरिक गुंतवणूक प्रकारासह सुनियोजित गुंतवणुकीने सुरक्षिततेसह अधिक परताव्याचा लाभ कसा पदरात पाडून घेता येईल, यावर भाष्य करतील.

कधी :  शनिवार, १९ ऑक्टोबर २०१९, सायंकाळी ६ वाजता

कुठे :   मराठा मंडळ सभागृह, वासुदेव  बळवंत फडके मार्ग, केळकर महाविद्यालयाजवळ, मुलुंड (पूर्व)

वक्ते : तृप्ती राणे कौस्तुभ जोशी