लोकसत्ता अर्थसल्लारविवारी पनवेलमध्ये

कमावत्या वयात घर, बंगल्यासारखे स्वप्न, वयाच्या मध्यम टप्प्यात मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न तसेच निवृत्तीच्या काळात आरोग्य जपवणुकीबरोबरच उर्वरित भविष्याची तजविज आदींचा सुलभ गुंतवणूक आलेख तयार करण्यासाठी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ यंदा नवी मुंबईतील पनवेलमध्ये होत आहे. ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावर तज्ज्ञ आर्थिक नियोजनकार यानिमित्ताने गुंतवणुकीचे विविध मार्ग दाखविण्यासह त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन विशद करतील.

‘कोटक म्युच्युअल फंड’च्या सहकार्याने हा उपक्रम रविवार, २ ऑक्टोबर २०१६ रोजी सकाळी १०.३० वाजता पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात होत आहे.

बँकेतील पारंपरिक बचतीचा दर महिनागणिक कमी होत असताना स्थिर मात्र अधिक परतावा देणारे कोणते धोरण असू शकते हे सनदी लेखाकार तृप्ती राणे या स्पष्ट करतील. ‘अर्थनियोजनातून स्वप्नपूर्ती’ नमूद करताना मौल्यवान धातू, स्थावर मालमत्ता या पर्यायातील गुंतवणुकीकडे विद्यमान स्थितीत कसे पहावे, हेही त्या सांगतील.

भांडवली बाजार व त्याच्याशी अधिकतर संबंध येणाऱ्या म्युच्युअल फंडविषयी गुंतवणूकविषयक सल्लागार वसंत माधव कुलकर्णी हे भाष्य करतील. ‘लोकसत्ता – अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखकही असलेले कुलकर्णी हे यावेळी म्युच्युअल फंड, त्यांचे प्रकार, त्यांचे शुल्क, त्यातील गुंतवणूक व परतावा असा सर्वागाने प्रकाश टाकतील.

यंदाच्या गुंतवणूक मार्गदर्शन पर्वातील हे दुसरे सत्र असेल. याद्वारे उपस्थित वाचक/श्रोत्यांना गुंतवणूकविषयक शंकांचे समाधान करून घेता येईल. तज्ज्ञ अर्थसल्लागारही अशा प्रश्नांचे सविस्तर उत्तर देत शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न करतील.

केव्हा, कुठे?

  • रविवार, २ ऑक्टोबर २०१६ सकाळी १०.३० वाजता
  • स्थळ : वासुदेव बळवंत फडके नाटय़गृह, सरस्वती विद्या मंदिरजवळ, जुन्या तहसील कार्यालयासमोर, पनवेल
  • तज्ज्ञ मार्गदर्शक : तृप्ती राणे (अर्थनियोजनातून स्वप्नपूर्ती), वसंत माधव कुलकर्णी (म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे)