पनवेलकरांसाठी रविवारी मार्गदर्शनाची पर्वणी

२८ हजाराच्या वर-खाली हेलकावे घेणारा सेन्सेक्स, १५ लाख कोटी रुपयांच्या वर गेलेली म्युच्युअल फंड मालमत्ता, घटत असलेले बँक ठेवींचे व्याज दर, मौल्यवान धातूंमध्ये अचानक आलेली दरचकाकी आणि गोठलेल्या स्थावर मालमत्तांच्या किंमती.. असे गोंधळून टाकणारे चित्र असताना नेमका कोणता गुंतवणूक मार्ग अनुसरावा ही द्विधास्थिती दूर करण्यासाठी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ पुन्हा एकदा आपल्या भेटीला आला आहे.

‘कोटक म्युच्युअल फंड’ प्रस्तुत हा गुंतवणूकदार मार्गदर्शन उपक्रम येत्या रविवारी, २ ऑक्टोबर २०१६ रोजी सकाळी १०.३० वाजता पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात होईल. या कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या न्यायाने विनामूल्य प्रवेश दिला जाईल.

प्रमुख निर्देशांकांनी गुरुवारी दीड टक्क्यापर्यंत आपटी नोंदविल्यानंतर भांडवली बाजाराकडे कसे पाहावे? त्यातील समभाग खरेदी-विक्रीबाबतचे धोरण  काय असावे? तसेच समभाग निगडित अथवा अन्य म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीबाबत काय निर्णय घ्यावा, आदी सद्यस्थितीत कळीच्या मुद्दय़ांवर मार्गदर्शन या उपक्रमात उपस्थितांना मिळणार आहे. त्याचबरोबर बँकेच्या मुदत ठेवी, कंपन्यांची ठेवी, रोखे, सोने-चांदी, घर-जागा, भविष्य निर्वाह निधी, नवीन निवृत्ती योजना आदी गुंतवणक/बचत पर्यायात किती प्रमाणात, कोणत्या वेळी गुंतवणूक करावी, हेही यानिमित्ताने उलगडून दाखविले जाईल.

‘अर्थनियोजनातून स्वप्नपूर्ती’ या विषयाद्वारे सनदी लेखाकार तृप्ती राणे या सर्वसाधारण गुंतवणुकीवर प्रकाश टाकतील. तर ‘लोकसत्ता – अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक वसंत माधव कुलकर्णी हे ‘म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील फायदे’ यावेळी सांगतील.

‘लोकसत्ता’च्या उपस्थित वाचक/गुंतवणूकदारांना यावेळी मंचावरील तज्ज्ञ आर्थिक नियोजकारांना गुंतवणुकीबाबतच्या शंका या प्रश्न विचारून निरसन करून घेता येतील. मुंबईतील माटुंगा येथील यंदाच्या पर्वातील सत्रशुभारंभानंतर पनवेलकरांसाठी हे दुसरे सत्र असेल.

केव्हा, कुठे?

  • रविवार, २ ऑक्टोबर २०१६ सकाळी १०.३० वाजता
  • स्थळ : वासुदेव बळवंत फडके नाटय़गृह, सरस्वती विद्या मंदिरजवळ, जुन्या तहसील कार्यालयासमोर, पनवेल
  • तज्ज्ञ मार्गदर्शक : तृप्ती राणे (अर्थनियोजनातून स्वप्नपूर्ती), वसंत माधव कुलकर्णी (म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे)