मोदी सरकारच्या कार्यकाळातील स्नोमॅन लॉजिस्टिक्सनंतर सलग दुसऱ्या म्हणजे शारदा क्रॉपकेम लि. कंपनीच्या प्रारंभिक भागविक्री (आयपीओ)ला गुंतवणूकदारांचा भरभरून प्रतिसाद लाभला आहे. तीन दिवस चाललेल्या आणि मंगळवारी सायंकाळी समाप्त झालेल्या शारदाच्या भागविक्रीत ६० पटीने अधिक भरणा होऊन गुंतवणूकदारांकडून तब्बल १८,००० कोटी रुपये उभे राहिले आहेत. कंपनीने प्रत्येकी १४५ रु. ते १५६ रु. किंमत पट्टय़ाने १.९१ कोटी समभागांची विक्री प्रस्तावित केली होती, प्रत्यक्षात ११४.८१ कोटी समभागांसाठी बोली लावणारे अर्ज दाखल झाले आहेत. सर्वाधिक बोली ही १५६ रुपये या वरच्या भावावर लावल्या गेल्याने, भागविक्रीतून कंपनीला अपेक्षित असलेले कमाल ३५२ कोटी रुपये उभारले जाणे शक्य दिसते.
एअरसेलकडून पूरग्रस्त काश्मीरींसाठी मोफत कॉल सेवा
मुंबई: काश्मिरातील पूरस्थिती लक्षात घेत खासगी क्षेत्रातील नवागत दूरसंचार कंपनी एअरसेलने जम्मू-काश्मीरवासीयांसाठी मोफत कॉल देऊ केले आहेत. यानुसार कंपनीचे पोस्टपेड तसेच प्रीपेडधारक बुधवार आणि गुरुवार अशा दोन दिवसांसाठी मोफत कॉल करू शकतील. परिसरातील २जी नेटवर्क पूर्वपदावर आणण्यासाठी दूरसंचार विभाग व सैन्यदल कार्यरत असल्याचेही स्पष्ट  करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या विद्यमान स्थितीत कार्यरत असलेल्या ३जीसाठीही कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही.
ब्रिटिश एअरवेजची निम्म्याने दरकपात
नवी दिल्ली: भारतातून अन्य देशांमध्ये होणाऱ्या उड्डाणासाठीच्या तिकीट दरांत ५० टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय ब्रिटिश एअरवेजने लागू केला आहे. लुफ्थान्सापाठोपाठ भारतीय हवाई प्रवासी दर युद्धात उडी घेणारी ब्रिटिश एअरवेज ही दुसरी विदेशी कंपनी ठरली आहे. यापूर्वी स्थानिक पातळीवर गोएअर, इंडिगो, स्पाइसजेट, एअर कोस्टा यांनी हा कित्ता गिरविला आहे.  भारतातील मुंबई, दिल्ली आदी ठिकाणांहून न्यूयॉर्क, लंडन, सॅन फ्रान्सिस्को आदी ठिकाणी होणाऱ्या उड्डाणासाठी ब्रिटिश एअरवेजने तिकीट दर ५० टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. ३१ डिसेंबपर्यंतच्या प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध असेल. कंपनीची विविध ७५ देशांमध्ये १५० हून अधिक ठिकाणी नियमित हवाई उड्डाणे होतात. तर मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद येथून आठवडय़ाला ४६ उड्डाणे होतात. यापूर्वी एअर लुफ्थान्सा, एअर फ्रान्स या विदेशी कंपन्यांनीही १० हजार रुपयांपर्यंत दर कपात जारी केली आहे.