11 December 2018

News Flash

भांडवली बाजारातील सूचिबद्धतेमुळे विमा उद्योगाबाबत गुंतवणूकदारांत सजगता वाढेल

तुम्हाला नेमका काय फायदा होईल?

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वसाधारण विमा कंपन्या आणि खाजगी क्षेत्रातील आयुर्विमा कंपन्यांच्या भांडवली बाजारातील सूचिबद्धतेला सुरुवात झाली आहे. विमा उद्योगाच्या सद्यस्थितीबाबत आणि याआधी भांडवली बाजारात सूचिबद्ध झालेल्या कंपन्यांच्या मुल्यांकनाबाबत ‘लोकसत्ता’ने विमा क्षेत्रातील जाणकार आणि महिद्रा इंशुरन्स ब्रोकर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक जयदीप देव्हारे यांच्याशी केलेल्या वार्तालापाचा हा संक्षिप्त वृतान्त..

  • तुमच्या कंपनीत एका नवीन गुंतवणूकदाराने भांडवली गुंतवणूक केली. या बद्दल काय सांगता येईल?

आमच्या कंपनीत अमेरिकेतील एक उद्यम भांडवलदार कंपनीने त्यांच्या सिंगापूरस्थित उपकंपनीच्या माध्यमातून चार वर्षांपूर्वी १५ टक्के भांडवल खरेदी केले होते. उद्यम भांडवलदार एका मुदतबंद फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करीत असल्याने आणि या फंडाची मुदत संपत असल्याने या फंडास आपली गुंतवणूक दुसऱ्या एखाद्या गुंतवणूकदारास विकण्याची गरज होती. नवीन गुंतवणूकदाराच्या विविध पर्यायांचा विचार करताना एक्सएल समूहाने आमच्या कंपनीत गुंतवणुकीबाबत रस दाखविला. हा समूह जगभरात २०० देशांतून विमा आणि पुन:र्विमा क्षेत्रात कार्यरत असलेला समूह आहे. यांना आमच्या कंपनीत २० टक्के मालकी हवी असल्याने आमचे प्रवर्तक महिंद्रा अँड महिंद्रा फायनांशियल सव्‍‌र्हिसेसने उद्यम भांडवलदारास ५ टक्के अतिरिक्त समभाग विकले. आणि या उद्यम भांडवलदराने हे सर्व २० टक्के समभाग एक्सएल समूहाला विकले. १४ वर्षांपूर्वी या कंपनीत प्रवर्तकांनी ५० लाख गुंतविले होते. विक्रीप्रसंगी या कंपनीचे मुल्यांकन १,३०० कोटी रुपये केले गेले. या फंडाला त्यांच्या चार वर्षांत मुळच्या गुंतवणुकीची अडीचपट वृद्धी झाली.

  • नवीन गुंतवणूकदार विमा आणि पुन:र्विमा उद्योगामध्ये असल्याने तुम्हाला नेमका काय फायदा होईल?

एक्सएल समूह न्यूयॉर्क शेअर बाजारात सूचिबद्ध असलेली कंपनी आहे. त्यांना उभरत्या अर्थव्यवस्थेतील विमा व्यवसायात विशेष रस आहे. या समुहाने विमा व्यवसायाशी संबंधित उद्यमशील तंत्रज्ञान कंपन्यांतून गुंतवणूक केली आहे. भारतातील विमा व्यवसायातील कंपन्या भांडवली बाजारात सूचिबद्ध होत आहेत. कंपन्या सूचिबद्ध झाल्यामुळे साहजिकच गुंतवणूकदार समुदायाचे या कंपन्यांकडे लक्ष वेधले जाईल. यापूर्वी विमा क्षेत्रात थेट गुंतवणुकीच्या संधी नसल्याने विमा क्षेत्राकडे गुंतवणूकदर विशेष लक्ष देत नसत. साहजिकच भारतातदेखील विमा उद्योगात तंत्रज्ञानाच वापर वाढत आहे. एक्सएल समुहाने ‘इन्शु टेक’ कंपन्यांतून गुंतवणूक केली असल्याने हे तंत्रज्ञान भारतात आणण्यास आणि आम्हाला अन्य विकसनशील देशात विमा व्यवसायात प्रवेश करण्याचा मार्ग खुला होईल. या कंपनीचे कार्यालय गुरुग्राम येथे असून विमा दाव्यांचे व्यवस्थापन, विमा पॉलिसी विक्रीपश्चात सेवा, नवीन उत्पादनांचा विकास यासारख्या विमा व्यवसायाशी संबंधित गोष्टी या कार्यालयातून होतात. भारतात एखाद्या दुर्दैवी घटनेमुळे नुकसान होण्याचे प्रमाण खूप आहे. जर विमा नसेल दुर्दैवी घटनेमुळे होणारे नुकसान ती व्यक्ती किंवा संस्था सहन करते. जर विमा असेल आणि विमा कंपनीने भरपाई दिली तर हे नुकसान विमा कंपनीचे होते. व्यक्ती किंवा विमा कंपनीचे नुकसान एका मर्यादेत राहावे यासाठी विम्याबद्दल जागरुकता होणे आवश्यक आहे. महिंद्रा समूहाला ग्रामीण भारतात विशेष रस असून ‘आरोग्य धन संपदा’ हे आमचे ब्रीद आहे. एखाद्या वाहनासाठी किंवा शेतीच्या अवजारासाठी महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसकडून कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा विमा, त्या वाहनाचा किंवा शेतीचा अवजाराचा विमा आणि शक्य तिथे समूह विमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यास आम्हाला रस आहे. आमच्या व्यवसायाचा परीघ विस्तारण्यास एक्सएल समुहाकडून मिळालेले तंत्रज्ञानाचा नक्कीच उपयोग होईल.

  • भारतात एक सरकारी मालकीची सर्वसाधारण विमा कंपनी सूचिबद्ध झाली आणि खाजगी मालकीच्या काही आयुर्विमा क्षेत्रातील कंपन्या सूचिबद्ध झाल्या. काही कंपन्यांच्या विक्रीपश्चात नोंदणीवेळी गुंतवणूकदारांना मोठी भांडवली वृद्धी मिळाली. विमा कंपन्यांच्या बाबतीत तसे झाले नाही. याचे कारण काय?

जेव्हा एखादी कंपनी भांडवली बाजारात सूचिबद्ध होते तेव्हा मिळणाऱ्या प्रतिसादाला अनेक घटक कारणीभूत असतात. आयुर्विमा सोडल्यास भारतात विमा व्यवसायाची बाजारपेठ मर्यादित आहे. भारतातील विमा उद्योग सरसरी १६ ते १७ टक्क्य़ांनी वाढत आहे. बाजारात नोंदणी पश्चातदराचा विचार करताना गुंतवणूकदाराच्या त्या समभागाकडून अपेक्षा वेगळ्या असतात. विमा कंपन्यांचे मुल्यांकन करताना विमा कंपनीने विकलेल्या वेगवेगळ्या पॉलिसींचे प्रमाण, पुन:र्विमाविषयक त्या कंपनीचे धोरण यांचा विचार केला जातो. प्रत्येक कंपनीच्या विमा ग्राहकांचे वय प्रमाण जीवनशैली यावर संभाव्य दाव्याचे प्रमाण ठरते. या गोष्टी विचारात घेऊन विमा कंपन्यांचे मुल्यांकन केले जाते. सूचिबद्ध विमा कंपन्याच्या बाजारात सूचिबद्धतेपश्चात मोठी भांडवली वृद्धी दिसत नसली तरी विमा कंपनीतील गुंतवणूक चार ते पाच वर्षे कालावधीत निर्देशांकापेक्षा अधिक परतावा नक्कीच देईल.

 

First Published on November 14, 2017 12:58 am

Web Title: loksatta interview with mahindra insurance brokers ltd jaideep devare