टाटा समूहातील टाटा प्रोजेक्ट्सने पायाभूत सोयीसुविधांच्या उद्योगातील पहिल्या तीन कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे. कंपनीच्या यशाबाबत टाटा प्रोजेक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक विनायक देशपांडे आपली मते मांडतात –

  • औद्योगिक प्रकल्प ते वैविध्यपूर्ण अस्तित्व हा टाटा प्रकल्प कंपनीचा प्रवास कसा राहिला? व्यावसायिकदृष्टय़ा या बदलाचा प्रभाव कसा पडत गेला?

गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये टाटा प्रकल्पांनी भारताच्या ग्रामीण पायाभूत सुविधा उद्य्ोगात महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना आपली पाळमुळे घट्ट रोवली. असे करताना टाटा प्रकल्पांनी औद्य्ोगिक बाजारातील आपले अस्तित्व तसूभरही कमी होऊ दिले नाही. औद्य्ोगिक सोयीसुविधांवर लक्ष केंद्रित करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असतानाच्या मागील काही वर्षांमधील गोष्ट मात्र निराळीच आहे. उर्जा प्रकल्प उभारणे, पोलाद उत्पादन आणि स्फोट भट्टी या उद्योगांवर कंपनीने लक्ष देण्यास सुरुवात केली. औद्य्ोगिक क्षेत्रातील मागण्या कमी होण्यास सुरुवात झाली; याची किंचितशी झळ कंपनीला बसली. त्यामुळे व्यवसायातील रणनीतीबद्दल पुनर्विचार करण्याचे आम्ही ठरवले. त्यानुसार उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही नव्या दृष्टिकोनातून वाटचाल करण्याचे ठरवले. मेट्रो, विमानतळ, उंच इमारती, सामाजिक पायाभूत सुविधा, सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या शहरी पायाभूत सुविधांकडे टाटा प्रकल्पांनी मोर्चा वळवला. बदलाचा हा प्रवास खडतर असला तरी त्याची फलनिष्पत्ती मात्र मिळू लागली. सलग चौथ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात ३५ टक्क्यांनी वाढ झाली होती. या वर्षी पहिल्या तिमाहीत ४५ टक्क्यांनी नफा नोंदवला गेला, वर्षभरात याच गतीने आम्ही वाटचाल करू असा विश्वास आहे.

  • सध्या तुमच्या व्यवसायाची रचना कशी आहे? कंपनीची बाजारातील स्थिती काय आहे?

सध्या आमचे सहा व्यवसाय घटक आहेत. प्रकल्पस्थळी आम्ही पाच ते सहा व्यवसायाद्वारे फक्त सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पहिला घटक म्हणजे अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम प्रकल्प. दळणवळण या दुसऱ्या घटकाद्वारे आम्ही रेल्वे आणि रस्ते गटावर लक्ष केंद्रित केले आहे. तिसरा घटक म्हणजे पारेषण आणि वितरण. चौथा गटक हा सामान्य बांधकाम सेवा देऊ शकेल असा बांधकाम आणि पर्यावरण तसेच सांडपाणी व्यवस्थापन. पाचवा घटक शहरी पायाभूत सुविधा होय.

या पाचही व्यवसायातील मागणी अनुशेष वाढला आहे. प्रत्येक व्यवसाय घटकामध्ये ५,००० कोटी रुपयांचा (५० अब्ज रुपये) मागणी अनुशेष आहे. या सर्वाची अंदाजित किंमत २५ हजार कोटी रुपये (२५० अब्ज रुपये) आहे. व्यवसाय मिळवण्याच्या बाबतीत सांगायचे झाले तर पायाभूत सोयीसुविधा पुरवणारी कंपनी म्हणून आमची भरभराट होत आहे. ‘थर्ड पार्टी’ प्रकल्पांसाठी परिक्षण, निरिक्षण आणि प्रमाणपत्र सेवांकरिता अभियंते पुरवणे या सहाव्या व्यवसायावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. यामधून आम्हाला १५० कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित आहे. विविधता आणि नंतर वितरण करणाऱ्या आमच्या काही प्रकल्पांमुळे टाटा प्रोजेक्टचे बाजारातील स्थान मजबूत झाले आहे. सद्य्स्थितीला शहरी पायाभूत सुविधांच्या बाबतीत आम्ही जागतिक पातळीवर स्पर्धा निर्माण केली आहे. या प्रकल्पांद्वारे आम्ही ५० टक्के हिस्सा जिंकला आहे. भारतीय रेल्वेचे वाहतूक मार्ग (पूर्व आणि पश्चिम) हे त्याचेच अलीकडील उदाहरण सांगता येईल. त्यामुळे छोटय़ा स्वरूपात सुरू झालेल्या या व्यवसायाने अव्वल तीन कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे. अल्पावधीतच मोठे यश संपादन केले आहे. गेल्या वर्षी आम्ही जो व्यवसाय केला त्यावरूनच आमची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. नेतृत्व क्षमता त्याचबरोबर डिजिटल उपRमांद्वारे आम्ही सतत चर्चेत असायचो. पहिल्यांदाच टाटा प्रकल्पांची या यादीत गणना करण्यात आली आहे.

  • कंपनीची भरभराट होताना तुम्ही एकंदरित सर्व परिस्थिती कशी हाताळली?

जलदगतीने कंपनीची वाढ होत असताना नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागले. शहरी पायाभूत सुविधा या व्यवसायात पहिल्यांदा पाऊल ठेवले तेव्हा योग्य भागीदार निवडताना तसेच या महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी लागणारी नवीन कौशल्य आणि गुणवत्ता निवडताना आमच्यासमोर अडचणी होत्या. मात्र टाटासारख्या नाममुद्रेमुळे सर्वोत्तम भागीदार मिळाले. त्यामुळेच आम्ही नवनव्या आव्हानांना सहजपणे तोंड देऊ शकलो. टाटा समूहाच्या मूल्यांशी निगडित नसलेल्या विविध संस्था आणि भागीदारांना आम्ही करारबद्ध केले. मात्र त्यांना टाटा समूहातील वातावरणाशी जुळवून घेता यावे, यासाठी आम्हाला समूहाच्या मनुष्यबळ विभागातील वरिष्ठ सहकाऱ्यांच्या हस्तक्षेपाची आवश्यकता होती. व्यवसायाची जलद गतीने वृद्धी होण्यासाठी स्वत:ची प्रणाली आणि प्रक्रिया उभी करणे हे आव्हानही आमच्यासमोर होते. त्यामुळेच आम्ही समूहातीलच टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसची मदत घेतली. एक चांगली कंपनी उभी करण्यासाठी संपूर्ण संस्थेत एकत्रित महत्त्वाकांक्षा असणे गरजेचे होते. त्यावरही आम्ही मात केली. म्हणूनच आम्ही इतक्या कमी कालावधीत मोठी झेप घेऊ  शकलो.

  • दळणवळणाच्या संदर्भात मालवाहतूक मार्गकरिता कंपनीने मोठी गुंतवणूक केली आहे. तुमच्याकडे मेट्रो प्रकल्पसुद्धा आहे त्याविषयी काय सांगाल?

आम्ही खरोखरच दळणवळणाचे लक्षणीय प्रकल्प हाती घेतले आहेत. ‘डेडिकेटेड फ्राइट कॉरिडॉर’ प्रकल्पाचे जवळपास ४० टक्के आम्ही घटक आहोत. यांत्रिक पद्धतीने रुळ बसविणाऱ्या यंत्राद्वारे आम्ही जवळपास २,२०० किमीचा रेल्वे मार्ग बसवला आहे. साधनसामग्री तसेच यंत्रे विकत घेण्यासाठी कंपनीने जवळपास ६०० कोटी रुपये (६ अब्ज) गुंतवणूक केली आहे. वेळेच्या आधी आम्ही हा प्रकल्प पूर्ण करणार असून ग्राहकांचे हित जपण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्याकडे तीन महत्त्वाचे मेट्रो प्रकल्प असून दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनसाठी आम्ही उन्नत (एलिव्हिटेड) कॉरिडॉर सांधणार आहोत. त्याचबरोबर लखनऊ मेट्रोसाठी आम्ही बांधकाम प्रकल्पाशी निगडीत आहोत. मुंबईतील भुयारी मेट्रो प्रकल्पाचे कामही आहे. दळणवळणापाठोपाठ अन्य क्षेत्रातही आमच्याकडे अनेक प्रकल्प आहेत. एकूणच सध्याचा काळ हा टाटा प्रोजेक्टसाठी रोमांचक आहे.