News Flash

अल्प व्याजदराचे पतधोरण मर्यादित कालावधीसाठीच असावे : लगार्ड

अर्थव्यवस्थेला सुलभ करू पाहणारे मध्यवर्ती बँकेचे पतधोरण हे मर्यादित कालावधीसाठी असावे आणि कमी व्याजदरासारख्या उपाययोजना या नेमक्या कारणांसाठीच उपयोगात आणल्या जाव्यात,

| March 18, 2015 06:29 am

अर्थव्यवस्थेला सुलभ करू पाहणारे मध्यवर्ती बँकेचे पतधोरण हे मर्यादित कालावधीसाठी असावे आणि कमी व्याजदरासारख्या उपाययोजना या नेमक्या कारणांसाठीच उपयोगात आणल्या जाव्यात, असा सल्ला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टीन लगार्ड यांनी भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेला दिला आहे.
आपल्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्याची सांगता लगार्ड यांनी मंगळवारी रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांच्या उपस्थितीत राहून केली. रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी पतधोरण पंधरवडय़ावर आले असताना त्यांनी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांना त्यांच्या उपस्थितीतच मंगळवारी मार्गदर्शन केले.
अर्थव्यवस्थेला नियमित वित्तीय पुरवठा करणे आणि व्याजदर कमी करणे अशा धोरणांचा उपयोग दीर्घकालावधीसाठी करता येणार नाही, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. अशा उपाययोजना या तात्पुरत्या असाव्यात, असे नमूद करताना संबंधितांवर परिणाम करणाऱ्यांनाही त्याची जाणीव द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हद्वारे बुधवारी उशिरा घेतल्या जाणाऱ्या पतधोरण उपायाबाबत भारतासारख्या विकसनशील राष्ट्राने सावध असावे व त्याच्या संभाव्य निर्णयाचा सामना करावा, असेही त्या म्हणाल्या. फेडरल रिझव्‍‌र्हमार्फत व्याजदर वाढ केली गेल्यास ते एक आश्चर्य ठरेल, असेही त्यांनी सांगितले. फेडरल रिझव्‍‌र्हच्या संभाव्य व्याजद राचा भारतावर विपरीत परिणाम होणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच मात्र देशाने सज्ज असावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या लगार्ड यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल आशावाद व्यक्त करत येत्या पाच वर्षांत देशाची अर्थव्यस्था ही जर्मनी व जपानच्या एकत्रित अर्थव्यवस्थेपेक्षाही मोठी असेल, असे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर शेजारच्या चीनला विकास दर तसेच लोकसंख्येतही भारत मागे टाकेल, असेही त्या म्हणाल्या होत्या.

अमेरिकेला इशारा!
अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हचे पूर्वाध्यक्ष बेन बर्नान्के यांच्या पतधोरणावर टीका करताना लगार्ड यांनी मिणमिणत्या मेणबत्तीपासूनही भडका होऊ शकतो, असा वाक्प्रचार उद्धृत करत २०१३ मधील आर्थिक मंदीसदृश स्थिती पुन्हा उद्भवण्याचा धोकाही बोलून दाखवला. अर्थव्यवस्थेत विश्वास निर्माण होत असताना अचानक पाऊल मागे वळल्यास अस्थिरताच अधिक दिसून येईल, असेही त्या म्हणाल्या. बाजारातील ही अस्वस्थता संपुष्टात आणून जोखीम कमी करण्याविषयी त्यांनी अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रांनाही इशारा दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 6:29 am

Web Title: low interest rate policy should be for short period said kristin lagarde
टॅग : Business News,Rbi
Next Stories
1 व्याज दर कमी न झाल्यास अर्थव्यवस्थेला फटका : अर्थमंत्र्यांची भीती
2 सहाराविरुद्ध अब्रुनुकसानीच्या खटल्याची ‘मिराच’ची तयारी; ४० कोटी डॉलरचा दावा
3 फंड घराण्यांना अच्छे दिन
Just Now!
X