07 March 2021

News Flash

‘एल अ‍ॅण्ड टी’ दोन लाख कोटी महसुलाचा उद्योगसमूह बनेल!

शुक्रवारी एल अ‍ॅण्ड टीच्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांसमोर नाईक यांनी हा विश्वास व्यक्त केला.

निवृत्तीच्या मार्गावरील अध्यक्ष ए एम नाईक यांचा विश्वास
अभियांत्रिकी, वित्तीय सेवा, माहिती तंत्रज्ञान, आरोग्यनिगा उपकरणे आदी क्षेत्रात फैलावलेल्या लार्सन अँड टुब्रोने (एल अ‍ॅण्ड टी) येत्या पाच वर्षांत महसुलात दुपटीने वाढीचे उद्दिष्ट राखले आहे. २०२०-२१ पर्यंत २ लाख कोटी महसुलाचा टप्पा गाठला जाईल, असा विश्वास अध्यक्ष ए. एम. नाईक यांनी व्यक्त केला आहे.
शुक्रवारी एल अ‍ॅण्ड टीच्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांसमोर नाईक यांनी हा विश्वास व्यक्त केला. भविष्याबाबत हा दांडगा आशावाद कोणतीही तडजोड न करता साकारला जाईल आणि वर्षांला २.५ लाख कोटींहून अधिकची कंत्राटे समूहाकडे असतील, असे ते म्हणाले.
मार्च २०१६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांत समूहाने १.०३ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. वार्षिक तुलनेत त्यात १२ टक्के वाढ झाली आहे. तर उत्पन्न ५,०९१ कोटी रुपये नोंदले गेले आहे.
गेल्या चार दशकांहून अधिक काळ समूहाच्या नेतृत्वस्थानी असलेले नाईक हे येत्या वर्षांत निवृत्त होत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आशावाद व्यक्त करतानाच त्याजोरावरच आपण एल अ‍ॅण्ड टी साठी हे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. योग्य धोरण व अंमलबजावणी याद्वारे हे शक्य होईल. अपेक्षिलेली उद्दिष्टय़े साध्य करण्यासाठी समूहाने दोन आंतरराष्ट्रीय सल्लागारांची नियुक्ती केल्याची माहिती त्यांनी दिली.
लार्सन अँड टुब्रो समूहातील माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आदी व्यवसायात विस्तारण्यास मोठी संधी असल्याचे नमूद करत नाईक यांनी जल व्यवस्थापन, स्मार्ट शहरे यावरही भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. गुणवत्ता आणि भांडवल संसाधनाची पुनर्बाधणी करणे, मालमत्ता व्यवसाय उभारणी अधिक भक्कम करणे यावरही येत्या कालावधीत भर दिला जाईल, असे ते म्हणाले.
देशातील संरक्षण क्षेत्र थेट विदेशी गुंतवणुकीसाठी खुले झाल्यामुळे समूहाला येत्या दशकभरात १३ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय मिळण्याची अपेक्षा नाईक यांनी यावेळी व्यक्त केली. अणुऊर्जा क्षेत्रातील वाढही येत्या कालावधीत वाढेल, असे नमूद करत नाईक यांनी अणुऊर्जा दायित्वाचा मुद्दा येणाऱ्या कालावधीत अधिक सुस्पष्ट होईल, असे सांगितले. या क्षेत्रातून १० वर्षांत ५०,००० कोटी रुपयांचा व्यवसाय मिळेल, असेही ते म्हणाले.
पायाभूत सेवा क्षेत्रातील १४ लाख कोटी रुपयांचे १,००० हून अधिक प्रकल्प प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. २००० पासून पंचवार्षिक धोरणात्मक प्रक्रिया राबविणाऱ्या समूहाद्वारे याबाबतची चौथी क्रांती नोंदविण्याच्या तयारी समूह असल्याचे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 1:05 am

Web Title: lt aims for rs 2 lakh cr revenue target by 2021
Next Stories
1 टाटा सन्सवर वेणू श्रीनिवास, अजय पिरामल यांची नियुक्ती
2 नवीन वायदापूर्ती मालिकेची सावध सुरुवात
3 आभूषण निर्यातीत वाढ
Just Now!
X