सामान्य विमा क्षेत्रातील देशातील  चौथी मोठी कंपनी एचडीएफसी अर्गोने एल अ‍ॅण्ड टी जनरल इन्शुरन्स या स्पर्धक कंपनीच्या संपूर्ण अधिग्रहणाची प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण केल्याचे जाहीर केले. ५५१ कोटी रुपयांच्या बदल्यात झालेल्या या व्यवहाराची घोषणा चालू वर्षांत जूनमध्ये करण्यात आली होती आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये विमा नियामक ‘इर्डा’ आणि भारतीय स्पर्धा आयोगाने या व्यवहाराला मंजुरी दिली होती.

एचडीएफसी समूहातील सामान्य विमा क्षेत्रातील कंपनी असलेल्या एचडीएफसी अर्गोने एल अ‍ॅण्ड टी जनरल इन्शुरन्सचे १०० टक्के भागभांडवल विद्यमान लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो या भागधारकांकडून खरेदी केले आहे. या ५५१ कोटी रुपयांच्या विक्री करारासंबंधाने उभयतांमध्ये जूनमध्ये विधिवत करार झाला होता. एल अ‍ॅण्ड टी जनरल इन्शुरन्सचे ताज्या व्यवहाराच्या पूर्ततेनंतर ‘एचडीएफसी जनरल इन्शुरन्स’ असे नामकरण करण्यात येणार असून, ती एचडीएफसी अर्गोची १०० टक्के मालकीची उपकंपनी म्हणून कार्यरत होईल. या नव्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एचडीएफसी अर्गोचे विद्यमान कार्यकारी संचालक मुकेश कुमार यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. एचडीएफसी लिमिटेडचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी विमा उद्योगातील हा एक महत्त्वाचा घटनाक्रम आहे, अशी प्रतिक्रिया दिली. एल अ‍ॅण्ड टी जनरल इन्शुरन्सच्या पॉलिसीधारकांचे एचडीएफसी परिवारात स्वागत करतो असे नमूद करताना, या अधिग्रहणाच्या प्रक्रियेला गतिमानता देण्यात इर्डा आणि स्पर्धा आयोगाने तत्परता दाखवून मोलाची भूमिका बजावल्याचे ते म्हणाले. एल अ‍ॅण्ड टी जनरल इन्शुरन्सचा २८ शाखा कार्यालयांद्वारे विस्तार फैलावला आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून उभयतांच्या अर्जाना मंजुरी मिळविल्यानंतर हा संपादनाचा व्यवहार पूर्ण होणार आहे.