कोविड-१९ विषाणूविरुद्धच्या लढय़ात सहभागी होताना लार्सन अँड टुब्रो समूहाने ‘पीएम केअर्स फंडा’साठी १५० कोटी रुपयांची देणगी जाहीर केली आहेत.

निधी उभारणी, कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी आणि कौशल्य प्रदान करण्याच्या उपक्रमात समूह सहभागी झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, बांधकाम, उत्पादन, वित्तीय सेवा क्षेत्रात प्रकल्प व्यवस्थापन करणाऱ्या समूहाने १.६० लाख कंत्राटी कामगारांना मदत करण्याच्या हेतूने दरमहा ५०० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद केली असल्याचे म्हटले आहे. टाळेबंदीच्या काळातही या कामगारांना वेतन देता यावे, इतर मजुरांना अन्न व मूलभूत सुविधा पुरविता याव्यात यासाठी ही रक्कम वापरण्यात येणार आहे.

लार्सन अँड टुब्रो समुहाचे अध्यक्ष ए. एम. नाईक म्हणाले, कोविड-१९ विषाणूविरुद्धच्या लढय़ासाठी निधी उभारणे, प्रशिक्षण शाळांचे रुपांतर विलगीकरण केंद्रांत करणे या कल्याणकारी उपक्रमातून आम्ही मदत करीत आहोत. अभियांत्रिकी व बांधकाम क्षेत्रांतील कौशल्याचा व ज्ञानाचा उपयोग सरकारी अधिकाऱ्यांना संकटाचा सामना करण्यासाठी करून देत आहोत.