अभियांत्रिकी क्षेत्रातील अग्रणी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोने आपल्या विद्युत आणि स्वयंचालन (ई अ‍ॅण्ड ए) व्यवसायाचे अंग पूर्णपणे १४,००० कोटी रुपयांच्या रोख मोबदल्यात श्नायडर इलेक्ट्रिक या जागतिक कंपनीकडे हस्तांतरणाचा करार केला असल्याचे मंगळवारी जाहीर केले.

एल अ‍ॅण्ड टीच्या गैर-मूलभूत व्यवसायातून अंग काढून घेण्याच्या व्यापक रणनीतीचा एक भाग म्हणून ई अ‍ॅण्ड ए व्यवसायातून ही  निर्गुतवणूक करण्यात आली आहे. यातून आपल्या भागधारकांसाठी दीघरेद्देशी मूल्य निर्मितीस हातभार लागणार आहे, असे लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचे मुख्याधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्रह्मण्यन यांनी स्पष्ट केले.

लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोकडून ई अ‍ॅण्ड ए व्यवसायांतर्गत अल्प आणि मध्यम विद्युत भाराच्या स्विचगीयर्स आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम्सची निर्मिती केली जात आहे. विक्री करण्यात आलेल्या या व्यवसायातून कंपनीने २०१७-१८ सालात ५,०३८ कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे. नवी मुंबई, अहमदनगर, बडोदे, कोईम्बतूर आणि म्हैसूर यासह विदेशात सौदी अरब, दुबई, कुवैत, मलेशिया, इंडोनेशिया आणि ब्रिटन येथे या व्यवसाय विभागाचे उत्पादन प्रकल्प आहेत.

श्नायडर इलेक्ट्रिकला झालेला हा विक्री व्यवहार नियामकांकडून शिक्कामोर्तब आणि मंजुऱ्याचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर मार्र्गी लागणार आहे.