मद्यार्क नसलेल्या पण उच्च कॅलरी आणि कॅफेइन उत्प्रेरकाने युक्त पेय अर्थात ‘एनर्जी ड्रिंक्स’ची तरुणाईमधील वाढती पसंती पाहून, मुख्यत: पेप्सिको आणि कोका-कोला या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्पर्धेत ‘मेड इन इंडिया’ ब्रॅण्ड्सही शड्डू ठोकून उतरू पाहत आहेत. बोल्ड, साहसी अशी पौरुष प्रतिमा धारण केलेले नामांकित रेमंड ब्रॅण्ड याचीच री ओढत आपले ‘केएस ई ड्रिंक’ लवकरच बाजारात आणत आहे.
‘गेट द केएस एनर्जी’ या टॅगलाइनसह रेमंड लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांनी ‘कामसूत्र (केएस)’ या कंडोम तसेच महिला व पुरुषांसाठी सुवासिक डिओसाठी लोकप्रिय बनविलेल्या नाममुद्रेअंतर्गत या नवीन एनर्जी ड्रिंक्सचे गुरुवारी विधीवत अनावरण केले. मिश्र फळांचा स्वाद असलेले ‘एक्स फ्रूट’ आणि मिश्र बेरी या फळाचा स्वाद असलेले ‘एक्स बेरी’ असे दोन प्रकार केएस ई ड्रिंकमध्ये असतील. कामसूत्र नाममुद्रेभोवती असलेले वलय या नव्या उत्पादनांचे अत्यंत स्पर्धात्मक बनलेल्या भारताच्या एनर्जी ड्रिंक्स बाजारपेठेत वेगळे स्थान कमावून देईल, असा विश्वास सिंघानिया यांनी व्यक्त केला.
आजच्या घडीला भारतात शीतपेयांच्या एकूण ६,००० कोटी रुपयांच्या बाजारपेठेत एनर्जी ड्रिंक्सचा हिस्सा जवळपास ५०० कोटी रुपयांच्या घरात पोहचल्याचा अंदाज आहे. या बाजारपेठेत कोका-कोलाने पहिले पाऊल टाकताना २००१ सालात ‘शॉक’ हे पेय प्रस्तुत केले. जगभरात ८० देशांमध्ये तगडी विक्री असलेल्या ‘शॉक’ला भारतातील प्रतिसाद मात्र थंडाच राहिला. पण २००८ मध्ये पेप्सिकोने या स्पर्धेत उडी घेतली आणि ‘रेड बुल’ आणि ‘पॉवर हॉर्स’ हे ऑस्ट्रेलियातून आयात होणारे ब्रॅण्ड्स पणाला लावले. लगोलग कोका-कोलानेही मलेशियात उत्पादित करून आयात होणारे ‘बर्न’ हे ब्रॅण्ड एनर्जी ड्रिंक्सच्या आखाडय़ात उतरविले. दोन बडय़ा कंपन्यांच्या स्पर्धा व प्रचार-प्रसारातून एनर्जी ड्रिंक्सची बाजारपेठ फुलत गेली इतकेच नव्हे तर ती वार्षिक २५ टक्के दराने वाढत असल्याचा ताजा अंदाज आहे.
रेमंड लि.च्या वस्त्रोद्योग विभागाचे अध्यक्ष अनिरूद्ध देशमुख यांच्या मते, एमर्जी ड्रिंक्सचे बाजारक्षेत्र अंदाजे ३३ टक्के या दराने वाढत जाणार आहे. कोक व पेप्सीच्या आयातीत उत्पादनांच्या तुलनेत केएस ई ड्रिंकचे देशांतर्गत होणारे उत्पादन ही बाब उपकारक ठरणार आहे. पण २५० मि.लि.च्या कॅनसाठी निश्चित करण्यात आलेली ९५ रुपयांची विक्री किंमत ही बाजारात उपलब्ध अन्य ब्रॅण्डशी बरोबरी साधणारीच आहे. किमतीच्या बाबतीत वेगळेपण मात्र सिंघानिया साधताना दिसत नाहीत.