News Flash

‘मेड इन इंडिया’ खेळणीनिर्मिती : जागतिक उज्ज्वल भवितव्य

पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातही खेळण्यांचे महत्त्व अधोरेखित करत, देशांतर्गत खेळणी उत्पादनावर भर दिला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

आरूषी अग्रवाल

लहान मुलांचे खेळ, मग ते मूर्त असो वा अमूर्त, मुलांच्या आकलनसंबंधी विकासाच्या आणि समाजात सहजपणे मिसळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. ते मुलांना चाकोरीबाहेरचा विचार करण्यास प्रवृत्त करतात. त्यांच्या सर्जनशीलतेला आणि कल्पक क्षमतांना खतपाणी घालतात. म्हणूनच नवीन शिक्षण धोरण, २०१९, खेळण्यांवर लक्ष केंद्रित करते. हे स्वागतार्ह पाऊल आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातही खेळण्यांचे महत्त्व अधोरेखित करत, देशांतर्गत खेळणी उत्पादनावर भर दिला आहे.

खेळण्यांकडे नव्याने लक्ष केंद्रित

भारतातील प्रत्येक राज्य आणि प्रदेशाला पिढय़ानपिढय़ा परिपूर्ण झालेल्या स्वत:च्या देशी खेळण्यांबद्दल निश्चितच अभिमान बाळगता येईल. अशा खेळण्यांमध्ये त्या त्या ठिकाणचे अत्युत्कृष्ट वस्त्रप्रकार, सुबक लाकूडकाम किंवा पारंपारिक भांडी अशी वैशिष्टय़े दिसून येतात. आधुनिक खेळण्यांबरोबरच भारतातील पारंपारिक खेळण्यांचा वारसा जागतिक उत्पादक आणि निर्यातदार अशी ओळख मिळवून देण्यास सक्षम आहे. ही क्षमता लक्षात घेत  सरकारने १४ केंद्रीय मंत्रालयांशी सल्लामसलत करून खेळण्यांसाठीचा १७ कलमी राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ात हस्तकलाधारित खेळण्यांच्या १३ प्रकारांना गरजांनुसार विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

कृती आराखडय़ात देशी खेळण्यांची सार्वजनिक खरेदी, ‘मेक इन इंडिया’ आणि देशी खेळण्यांच्या समूहांना प्रोत्साहन, ग्राहक जागरूक मोहीम राबवणे, गुणवत्ता नियंत्रण लागू करणे आणि उद्योगातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे या बाबींचा समावेश आहे. या आराखडय़ांतर्गत वस्त्रोद्योग मंत्रालयाने २७ फेब्रुवारी ते २ मार्च २०२१ दरम्यान खेळण्यांचा राष्ट्रीय मेळावा आयोजित करण्याचेही प्रस्तावित केले.

भारतातील जमेची बाजू

भारतीय खेळणी उद्योगाची उलाढाल १ अब्ज डॉलरची आहे. स्थानिक आणि जागतिक खेळणी निर्मात्यांना या क्षेत्रात संधी आहे. कच्च्या मालाच्या मुबलक उपलब्धतेमुळे (प्लास्टिक, कागद आणि कापड स्पर्धात्मक दरात उपलब्ध; भारत पॉलिस्टर आणि संबंधित तंतूंचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे) आयात करण्याची गरज कमी झाली आहे. उत्पादन खर्च कमी होत असल्यामुळे हा उद्योग फायदेशीर ठरतो. क्षेत्रातील ४,००० उत्पादकांच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. यात ७५ टक्के सूक्ष्म एककांचा समावेश आहे. लघू आणि मध्यम उद्योगांचे प्रमाण २२ टक्के आहे.

मोठय़ा प्रमाणात खेळणी कशी तयार करावीत हे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून भारतभरातील अनेक खेळणी निर्मात्यांनी दाखवून दिले आहे. भारतातील या क्षेत्रातील अंगभूत वैविध्यामुळे जागतिक स्तरावरील खेळण्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी भारत हा व्यवहार्य पर्यायी स्त्रोत असल्याचे अधोरेखित होते.

भारताच्या वर्धित क्षमतांमुळे उत्पादनांची बाजारपेठ म्हणून भारताने अनुकुल  स्थान प्राप्त केले आहे. खेळण्यांचे उत्पादन करणाऱ्या इतर देशांच्या तुलनेत भारतात स्वस्त दरात मोठय़ा प्रमाणावर कुशल कामगार सहजपणे उपलब्ध होत आहे. वर्ष २०२५पर्यंत अंदाजे १.४ अब्ज लोकसंख्येसह भारत ही एकाच देशात उपलब्ध असलेली सर्वात मोठी एकात्मिक बाजारपेठ असेल. खेळणी उत्पादकांच्या दृष्टीने जलद आणि सुलभतेने उत्पादनाची विक्री करता येणाऱ्या आणि  मोबदला मिळवून देणाऱ्या अशा प्रकारच्या बाजारपेठेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

भारताची देशांतर्गत उत्पादन क्षमता

खेळण्यांच्या निर्यातीच्या बाबतीत ३२.६ टक्के सहभागासह महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि कर्नाटकचा वाटा अनुक्रमे १९.३ आणि १३.६ टक्के इतका आहे. या क्षेत्रातील इतर उदयोन्मुख राज्यांमध्ये तमिळनाडू, गुजरात, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे. हे समूह पारंपारिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या खेळण्यांची मागणीची पूर्तता करतील आणि स्रोत आणि निधीचे समसमान वितरणही होईल. महत्त्वाचे म्हणजे ही राज्य सरकारे ३० टक्के भांडवली गुंतवणूक अनुदान देऊ करत आहेत, जे उत्पादकांना आकर्षित करण्यासाठी पुरेसे आहे.

भारतात तंत्रस्नेही मंचवापरावर (डिजिटलायझेशन) भर दिला जात आहे, जे खेळणी उद्योगांसाठी उपकारक ठरणार आहे. एकात्मिक डिजिटल मंचामुळे स्वदेशी खेळण्यांच्या समूहांची माहिती सर्वदूर पोहोचू शकेल आणि ते समूह अधिकाधिक मंचांपर्यंत पोहोचू शकतील. खेळण्यांच्या मागणीतील ही वाढ, पारंपारिक खेळण्यांचा उद्योग ज्यांच्यावर अवलंबून आहे अशा हजारो पारंपारिक हस्तकला कारागीरांना आधार देईल. ज्याप्रमाणे लहान मुलांच्या सर्वांगिण विकासात खेळणी महत्त्वाची भूमिका निभावतात. त्याचप्रमाणे देशातील खेळणी उद्योग अनेक आर्थिक पैलूंसाठी साहाय्यक ठरतो. खेळणी उद्योगाला  स्थानिक स्तरापासूनच सक्षम करण्यासाठीचा हा एकात्मिक दृष्टीकोन, खऱ्या अर्थाने भारताला आत्मनिर्भर करण्यास सहाय्यक ठरेल.

(लेखिका ‘इन्व्हेस्ट इंडिया’मध्ये संशोधक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2021 12:46 am

Web Title: made in india toy making bright future for the world abn 97
Next Stories
1 तुटीचे भगदाड पतमानांकनदृष्टय़ा जोखमीचे
2 खासगीकरणाविरुद्ध कामगारांचे आज आंदोलन
3 नव्या सौरऊर्जा प्रकल्पांचा दरही वाढणार
Just Now!
X