नव्याने घेतलेल्या उत्पादनांचे नमुने चाचण्यांत उत्तीर्ण
नेस्लेच्या समभागाला तेजी

नेस्ले इंडियाने मॅगी नूडल्सचे नव्याने उत्पादन केल्यानंतर त्याच्या चाचण्या घेतल्या असून त्यात हे उत्पादन सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता मॅगीची किरकोळ विक्री याच महिन्यात सुरू होणार आहे. कर्नाटकातील नानजनगुड (कर्नाटक), मोगा (पंजाब) व बिचोलिम (गोवा) येथे मॅगी नूडल्सचे नव्याने उत्पादन करण्यात आले. एनएबीएल प्रमाणित प्रयोगशाळांमध्ये त्याच्या चाचण्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आल्या, त्यात काही आक्षेपार्ह आढळलेले नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे आम्ही पालन केले असून मॅगी नूडल्स मसाला या उत्पादनाची विक्री याच महिन्यात सुरू केली जाईल. तसेच, ज्या राज्यात परवानगी आवश्यक असेल तेथे ती घेतली जाईल, असे नेस्ले इंडियाच्या निवेदनात म्हटले आहे.
नेस्लेच्या मॅगी नूडल्स तहलीवाल व पंतनगर येथेही तयार होतात. तेथे उत्पादन सुरू करण्यासाठी आम्ही हिमाचल प्रदेश व उत्तराखंड सरकारच्या संपर्कात आहोत, असेही सांगण्यात आले.
नेस्ले इंडियाने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय प्रमाणित प्रयोगशाळांमध्ये ३५०० चाचण्या करण्यात आल्या आहेत. अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया व इतर ठिकाणी मॅगीची भारतातून जी निर्यात केली होती त्यात मॅगी सुरक्षित ठरली आहे. ‘नॅशनल अ‍ॅक्रिडिशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरिज-एनएबीएल’ या संस्थेच्या तीन प्रयोगशाळांनी मॅगीच्या नमुन्याना हिरवा कंदील दाखवला आहे, त्यात सुरक्षित मानकापेक्षाही शिशाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे.

बाजारवापसीच्या आशेने नेस्ले समभाग उंचावला
मुंबई : मॅगी नूडल्सच्या पुनर्विक्रीची घोषणा नेस्ले इंडियाने केल्यानंतर कंपनीचा समभाग बुधवारी व्यवहारात ४ टक्क्यांपर्यंत उंचावला. दिवसअखेर मात्र त्याला मंगळवारच्या तुलनेत फार मोठे यश मिळाले नाही. मुंबई शेअर बाजारात कंपनीचा समभाग सत्रात ३.९२ टक्क्यांनी वाढला. व्यवहार संपुष्टात आले तेव्हा मात्र तो ०.२१ टक्क्यांच्या वाढीसह ६,२४७.१५वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजारात त्याला ०.५३ टक्के अधिक भाव मिळत समभाग मूल्य ६,२५१.१५ रुपयांवर राहिले. सरकारमान्य प्रयोगशाळांमध्ये कंपनीचे खाद्यपदार्थ उत्तीर्ण झाले असून त्यांची नव्याने निर्मिती करण्यात येईल, अशी घोषणा नेस्ले इंडियाने केली.