बँक ऑफ महाराष्ट्रच्या देशभरात २२५ नव्या शाखा उघडण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष नरेंद्र सिंह यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. या शाखा वर्षभरात सुरू होतील. बँक ऑफ महाराष्ट्रचे अस्तित्व सध्या २९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे. बँकेच्या १७५६ शाखा, ८०२ एटीएम केंद्रे आणि १०२ महाग्राम सेवा केंद्रे आहेत. या पहिल्या तिमाहीत बँकेने २९ नव्या शाखा सुरू केल्या आहेत. बॅंकेचा विस्तार वाढत असल्याने नवीन २२५ शाखा देशात उघडणार आहेत, त्यापैकी ११० महाराष्ट्रात असतील, असे सिंह यांनी सांगितले.
ल्ल  बँकेच्या नफ्यात ५९ टक्के वाढ
बँकेच्या नफ्यात सुमारे ५८.७७ टक्के वाढ झाली आहे. २०१२-१३ च्या पहिल्या तिमाहीअखेरीस ४४०.२१ कोटी रुपयांच्या तुलनेत २०१३-१४ च्या पहिल्या तिमाहीअखेरीस नफा ६९८.९१ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. बँकेतील एकूण ठेवी ३० जूनअखेर १ लाख ५ हजार ४४६ कोटी रुपये झाल्या आहेत.बँकेला आतापर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील ‘सवरेत्कृष्ट बँक’, ‘सर्वाधिक प्रशंसनीय सेवा’, ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’, आदी अनेक पुरस्कार मिळाले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.