‘मॅग्नेटिक महाराष्ट्रां’तर्गत अनेक व्यवसाय बैठक, परिषदा
येत्या शनिवारपासून होणाऱ्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहांतर्गत ‘मेक इन महाराष्ट्र’ आणि ‘मेक इन मुंबई’ मोहिमेलाही सामावून घेण्यात आले आहे. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ नाव धारण केलेले स्वतंत्र भव्य दालन सप्ताह समारंभस्थळी असेल. १०,००० चौरस फूट आकारातील या दालनामध्ये राज्यातील वाहन आदी प्रगतिशील निवडक क्षेत्राचा आढावा घेणारे मंच असतील. औद्योगिकदृष्टय़ा राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण आदी भागावरही याद्वारे प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा राखणाऱ्या निवडक ११ क्षेत्रांवर १३ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यामध्ये संरक्षण व अंतराळ, वाहन, रसायन व पेट्रोकेमिकल, बांधकाम उपकरण व तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, पायाभूत विकास, माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक, औद्योगिक उपकरण, औषधनिर्माण, वस्त्रोद्योग आणि सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग यांचा समावेश केला गेला आहे.
सप्ताहानिमित्ताने मुंबईत विविध ६० देशातील १००० हून अधिक व्यवसाय शिष्टमंडळे उपस्थित राहणार आहेत. तर भारतातील २५०० व्यवसाय शिष्टमंडळांचा समावेश असेल. देशातील १९२ कंपन्या आणि मुकेश अंबानी, रतन टाटा आदी उद्योजक या सप्ताहास उपस्थित असतील.
प्रसारमाध्यमांच्या पुढाकाराने सप्ताहांतर्गत व्यवसाय मंच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सीएनएनतर्फे चर्चात्मक कार्यक्रम होईल. तर टाइम नियतकालिकातर्फे निर्मिती क्षेत्रासाठीचा पुरस्कार वितरण सोहळा होईल.
भविष्यातील औद्योगिक प्रगतीचे प्रकल्प असलेल्या दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टा, बंगळुरू-मुंबई आर्थिक पट्टा, कोकणातील समुद्रकिनाऱ्यालगतचे बहुविध प्रकल्प यांचे सादरीकरणही यावेळी केले जाईल.