मुंबई : महिला सबलीकरणासोबतच वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार कन्या वन समृद्धी योजना राबवणार आहे. त्यानुसार शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आल्यावर पाच रोपे सागाची, दोन रोपे आंब्याची आणि फणस, जांभूळ व चिंचेचे प्रत्येकी एका रोप मोफत देण्यास राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. पर्यावरणाचे संतुलन सांभाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून शासनातर्फे मोठय़ा प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच महिला सक्षमीकरणही साधले जावे यासाठी वन विभागातर्फे ही विशेष योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त दोन मुलींसाठीच दिला जाईल. फळबाग लागवड योजनेतून या लाभार्थ्यांना मदत करण्याबाबतही विचार करण्यात येत आहे. कन्या वन समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत जन्म झालेल्या मुलींच्या पालकांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज केल्यानंतर त्यांना वन विभागाकडून १० रोपे उपलब्ध करून देण्यात येतील.