X

‘जागतिक बदलांनुसार राज्याचे नवे औद्योगिक धोरण’

कार्यशाळेत राज्यभरातून आलेल्या उद्योजकांचे पाच गट तयार करण्यात आले होते.

मुंबई : चौथी औद्योगिक क्रांती घडवण्यासाठी जागतिक स्तरावरील बदलानुसार महाराष्ट्र शासन नवे औद्योगिक धोरण ठरवत असून त्यासाठी उद्योजक, औद्योगिक संघटनांच्या सूचनांचा साकल्याने विचार केला जाईल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाचे नवीन औद्योगिक धोरण ठरवण्यासाठी बोलावण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते.

यावेळी देसाई यांनी नवीन औद्योगिक धोरण ठरवण्यामागची भूमिका विषद केली. राज्य शासनाच्या उद्योग विभागाने नवीन औद्योगिक धोरण ठरवण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी उद्योजकांसोबत चर्चा करून सूचना मागविल्या होत्या. त्याच अनुषंगाने सोमवारी मुंबई येथे पुन्हा राज्यभरातील औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच उद्योजकांची कार्यशाळा घेण्यात आली. जागतिक स्तरावरील बदलानुसार चौथी औद्योगिक क्रांती घडवण्यासाठी नवे औद्योगिक धोरण ठरवण्यात येत असल्याचा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. नव्या धोरणात विजेवर चालणाऱ्या वाहनांबाबतचे धोरण, नॅनो टेक्नॉलॉजी, विकास व संशोधन, महिला उद्योजक धोरण, अन्न प्रक्रिया उद्योग, औषधनिर्मिती या क्षेत्रावर अधिक भर दिला जाणार आहे.

लघू व मध्यम उद्योग, उद्योग क्षेत्राचा कणा आहे तो मजबूत करण्यावर नव्या औद्योगिक धोरणात भर राहणार आहे. उद्योग वाढण्यासोबत रोजगारांची संधी वाढावी व देशाच्या प्रगतीत भर पडावी हा औद्योगिक धोरण ठरवण्यामागचा हेतू असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.

कार्यशाळेत राज्यभरातून आलेल्या उद्योजकांचे पाच गट तयार करण्यात आले होते. त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा करून सर्व सूचना ऐकून घेतल्या. या सूचना मुख्यंमत्री, विविध विभागाचे मंत्री, सचिव, विभागाचे प्रतिनिधींसमोर ठेवल्या जातील. त्यानंतर नव्या औद्योगिक धोरणाचा अंतिम आराखडा ठरवण्यात येईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्यावतीने प्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण ठरविण्यासाठी राज्यभरातील उद्योजक तसेच प्रमुख उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींची एक कार्यशाळा मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यशाळेला उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव सतिश गवई, उद्योग विकास आयोगाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र राज्य औद्य्ोगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी संचालक संजय सेठी, महाराष्ट्र राज्य लघू उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव पी. अनबलगन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कार्यशाळेत महिंद्र, इन्फोसिस, गोदरेज समूहाचे तर भारतीय औद्योगिक महासंघ या उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नवीन औद्य्ोगिक धोरण कसे असावे यावर मान्यवरांनी सूचना केल्या. नवीन औद्योगिक धोरण सर्वसमावेशक असेल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. उद्योग क्षेत्रातील बदलानुसार नवीन औद्योगिक धोरण असेल, असे देसाई यांनी सांगितले. विविध कंपन्याच्या प्रतिनिधींनी नवीन धोरणावर सखोल चर्चा करून काही सूचना केल्या. यापूर्वी विभागीय स्तरावर अशा प्रकारच्या कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या. नव्या औद्योगिक धोरणात या कार्यशाळेतील सूचनांचा समावेश करण्यात येणार आहे.