एप्रिल २०१५ अखेरीस म्युच्युअल फंडांकडे जमा सुमारे १२.०२ लाख कोटींच्या गंगाजळीत, समभागसंलग्न (इक्विटी) योजनांचा वाटा ३.०६ लाख कोटींचा आहे. यापैकी तब्बल १ लाख २१ हजार कोटींचा हिस्सा राखत महाराष्ट्राने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. महाराष्ट्रापाठोपाठ २८,०५८ कोटी रुपये अशा तुलनेने खूप कमी मालमत्तेसह दिल्ली व ‘एनसीआर’ नावाने ओळखला जाणारा राजधानीच्या आजूबाजूच्या क्षेत्राचा दुसरा क्रमांक येतो.  
म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संस्था असलेल्या ‘अ‍ॅम्फी’च्या आकडेवारीनुसार या दोन भौगोलिक क्षेत्रांपाठोपाठ कर्नाटक (२७,६२५), गुजरात (२५,४०२) व पश्चिम बंगाल (२१,१८९) या राज्यांचा पहिल्या पाच क्रमांकात समावेश होतो. अर्थात देशाची आर्थिक राजधानी व जागतिक व्यापार केंद्र असलेल्या मुंबईला सामावून घेणाऱ्या महाराष्ट्राचा या गुंतवणूक पर्यायावर वरचष्मा असणे नवलाचे नाही. पण म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून केलेल्या समभाग गुंतवणुकीत एकटय़ा महाराष्ट्राचा बाजारहिस्सा ३५ टक्क्य़ांहून अधिक असण्याचा क्रम गेल्या कैकवर्षांपासून कायम राहिला आहे. एकूण समभाग गुंतवणुकीकडे ओढा वाढत असला, तरी अन्य ठिकाणांहून गुंतवणूक वाढीचे प्रमाण फारसे लक्षणीय राहिलेले नाही.
वार्षकि वाढीत दिल्ली व एनसीआर क्षेत्रातून म्युच्युअल फंडांत येणाऱ्या निधीत १५८ टक्के तर हरयाणा राज्यातून येणाऱ्या निधीत ११७ टक्के वाढ झाली आहे. म्युच्युअल फंडांच्या परिभाषेत ‘टी १५’ अर्थात मुंबई-पुण्याचा समावेश असलेल्या गुंतवणूक नकाशावरील आघाडीच्या बडय़ा १५ शहरांचा सरलेल्या वर्षांत एकूण गंगाजळीतील वाटा केवळ एका टक्क्याने वाढला आहे. तर या बडय़ा शहरांपल्याडच्या ‘बी १५’ अन्य १५ शहरांचा वाटा मागील वर्षीच्या २३ टक्के वृद्धीदराच्या तुलनेत यंदा घटून २० टक्के वाढीचा राहिल्याचे आढळून आले आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, मेघालय, सिक्कीम या राज्यांतील गुंतवणूकदारांचे म्युच्युअल फंड गंगाजळीतील योगदान एक हजार कोटींहून कमी (एक सहस्रांश टक्क्य़ांपेक्षा कमी) इतके नगण्य आहे.
आम्ही आमची मातृसंस्था असलेल्या मुंबई शेअर बाजाराच्या साहाय्याने देशभर गुंतवणूकदार प्रशिक्षण मेळावे भरवत आहोत. या कार्यशाळेत समभाग गुंतवणुकीच्या विविध अंगांचे प्रशिक्षण आम्ही गुंतवणूकदारांना देत असतो, असे सेन्ट्रल डिपॉझिटरी सíव्हसेसचे आíथक साक्षरता विभागाचे प्रमुख अजित मंजुरे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
प्रत्यक्ष समभाग अथवा म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून केलेली अप्रत्यक्ष समभाग गुंतवणूक लहान लहान शहरात पोहचावी असा सेबीचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून म्युच्युअल फंडांना त्यांच्या एकूण मालमत्तेच्या ०.२० टक्के रक्कम म्हणजे साधारण २४०० कोटी रुपये गुंतवणूक शिक्षण-जागरणासाठी दरसाल खर्च होणे अपेक्षित आहे.
२२ लाख नवगुंतवणूकदार
‘अ‍ॅम्फी’च्या याच अहवालात २०१४-१५ या आíथक वर्षांत नवीन २२ लाख गुंतवणूकदारांनी पहिल्यांदा म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून शेअर बाजारात प्रवेश केल्याचे समोर आले आहे. यापकी ३५ टक्के गुंतवणूकदारांनी आपल्या पहिल्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी एचडीएफसी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, बिर्ला सनलाइफ, रिलायन्स व यूटीआय या देशातील अनुक्रमे पहिल्या पाच मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांच्या योजनांची निवड केली आहे.