यूव्ही या नावाची जोड देण्याची परंपरा महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रने तिच्या नव्या कॉम्पॅक्ट श्रेणीतील वाहनाद्वारे राखली आहे. केयूव्ही१०० या नव्या वाहनाची ओळख करून देताना कंपनीने त्यात पेट्रोल इंजिनाचा उपयोग केला आहे. अभिनेता वरुण धवनला या वाहनाचा राजदूत म्हणून पुढे केले आहे.
एस१०१ नावाने यापूर्वी कागदावर असलेली नवी कॉम्पॅक्ट केयूव्ही१०० सादर करण्यापूर्वी समूहाची याच नामसाधम्र्यातील टीयूव्ही३०० व एक्सयूव्ही५०० एसयूव्ही गटातील वाहने भारतीय बाजारपेठेत आहेत. कंपनीचे नवे वाहन ह्य़ुंदाईच्या ग्रॅण्ड आय१० तसेच फोर्डच्या फिगोला स्पर्धा देईल.
नव्या वाहनाची छबी प्रसारमाध्यमांसमोर दाखविण्यात आली. प्रत्यक्षात हे वाहन १५ जानेवारीपासून विक्रीसाठी असेल. सात विविध रंगांमधील हे वाहन पेट्रोल तसेच डिझेल पर्यायातही असेल. नव्या वाहनासाठी कंपनीने ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पुणेनजीकच्या चाकण प्रकल्पात ती तयार केली जात आहे.
नवीन कल पेट्रोल वाहनांकडे?
एसयूव्ही श्रेणीत अव्वल असणाऱ्या महिंद्रची वाहने अधिकतर डिझेलवर चालणारी आहेत. नवी दिल्लीत डिझेल वाहनांवर आलेल्या मर्यादेनंतर समूहाने तीव्र नापसंती व्यक्त केली होती. असे असतानाच कंपनीने स्वत: विकसित केलेले पेट्रोलवरील एमफाल्कन इंजिनही नव्या वाहनाच्या जोडीने शुक्रवारी मुंबईत सादर केले. अर्थात डिझेल इंजिन प्रकाराही केयूव्ही१०० उपलब्ध होत असल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.