वाहन क्षेत्रात कडव्या स्पर्धक असलेल्या दोन बडय़ा उद्योगसमूहांमध्ये पुन्हा एकदा रण पेटले आहे. छोटय़ा व्यापारी वाहन बाजारपेठेत ‘छोटा हाथी’ असे नामाभिधान असलेल्या ‘एस’द्वारे घट्ट पाय रोवून बसलेल्या टाटाच्या लहानग्या व्यापारी वाहनांना टक्कर देतील अशी महिंद्रचे अँड महिंद्रने या श्रेणीतील तब्बल आठ वाहने मंगळवारी सादर केली.
तेलंगणमधील महिंद्रच्या देशातील सातव्या मोठय़ा प्रकल्पात ‘जितो’ नावाने तयार करण्यात आलेली या प्रकारातील ही वाहने स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत ५० हजारांपर्यंत स्वस्त व इंधन क्षमतेत ३० टक्क्यांपर्यंत लाभ मिळवून देतील, असा दावा करण्यात आला आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक पवन गोएंका व वाहन विभागाचे अध्यक्ष प्रवीण शाह यांच्या उपस्थितीत मंगळवारी या वाहनांचे देशभरातून आमंत्रित पत्रकारांपुढे अनावरण करण्यात आले.
विविध प्रकारच्या मालवाहतुकीला साजेशी ठरतील, अशा वेगवेगळ्या प्रकारांत मिहद्रने डिझेलवर चालणारी छोटेखानी चारचाकी वाहने प्रस्तुत केली आहेत. यातील दोन विविध इंधन क्षमतेचे, वेगवेगळ्या वजन वाहन क्षमतेतील दोन आणि भिन्न आकारमान असलेले तीन असे एकूण आठ मिनी ट्रक मॉडेल्स ‘जितो’ या नावाने बाजारात येतील. देशभरात विविध पाच रंग प्रकारांत ती उपलब्ध झाली आहेत.
खरेदीदारांना वित्तीय सवलत व अन्य वाहनांच्या बदल्यात ‘जितो’ उपलब्ध करून देतानाच, मिहद्रने नव्या वाहन प्रकाराच्या प्रचार-प्रसाराची जबाबदारी सदिच्छादूत म्हणून हिंदीतील अभिनेता मनोज वाजपेयी याच्यावर सोपविली आहे.
पिआज्जिओचे ‘आपे’ व टाटांच्या ‘एस’ या वाहनांशी नव्या ‘जितो’ची थेट स्पर्धा असेल, असे या वेळी कंपनीकडून सांगण्यात आले व तशी आकडेवारीतील तुलनाही सादरीकरणाप्रसंगी करण्यात आली.
तेलंगण राज्यातील कंपनीचा हा दुसरा प्रकल्प असून, या संकुलातील ३५० एकर क्षेत्रफळावर नवीन वाहनासाठी स्वतंत्र रचना करण्यात आली आहे. या नव्या व्यावसायिक स्वारस्यासाठी ३०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. वार्षिक एकूण अडीच लाख वाहननिर्मिती क्षमता असणाऱ्या या प्रकल्पातून वर्षांला दीड लाख जितो वाहने तयार केली जाणार आहेत. कंपनी याच व्यासपीठावर आधारे किफायती गटातील प्रवासी वाहनही येत्या वर्षभरात बाजारात आणेल, असे सांगत गोएंका यांनी सध्या याच धर्तीच्या वाहन प्रकारात असलेल्या टाटा मोटर्सबरोबर स्पर्धा येत्या काळात आणखी वाढणार असल्याचे सूतोवाच केले.

टाटा ‘बडे दिल’वाले..
‘वाहन उद्योगात मिहद्र पुढे गेली,’’ या टाटा समूहाचे रतन टाटा यांच्या उद्गाराबद्दल गोएंका यांना प्रश्न करण्यात आला. त्यावर, ‘‘ते त्यांचे काम करतात, तर आमचे काम आम्हीही चांगलेच करतो; उनका दिल बडा है..’’ अशा शब्दांत प्रतिक्रिया देत गोएंका यांनी अधिक बोलण्याचे टाळले. स्पर्धक असतानाही वाहन बाजारपेठेत मिहद्रची आगेकूच सुरू असल्याची कबुली देण्यासाठी हृदय मोठेच असावे लागते, असे त्यांनी या प्रतिक्रियेतून अप्रत्यक्षपणे सुचविले.