उत्पादन शुल्कातील सवलत संपण्यास दोन महिन्यांचा कालावधी असताना महिंद्र समूहाने तिच्या विविध वाहनांच्या किमती ११,५०० रुपयांपर्यंत वाढविण्याचे पाऊल उचलले आहे. वाढत्या उत्पादित खर्चाचे निमित्त यासाठी देण्यात आले आहे.
एसयूव्ही (स्पोर्ट युटिलिटी व्हेकल) श्रेणीत आघाडीवर असणाऱ्या महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रने तिच्या प्रवासी तसेच व्यापारी वाहनांच्या किमती चालू महिन्यापासूनच २,३०० ते ११,५०० रुपयांपर्यंत वाढविण्याचा घेतला आहे.
वाहनांवर सध्या उपलब्ध असलेली उत्पादन शुल्क सवलत डिसेंबर २०१४ पर्यंत कायम राहणार आहे. घसरत्या विक्रीत वाहन उद्योगाला सहकार्य मिळण्यासाठी निवडणूकपूर्व केंद्रीय अर्थसंकल्पात कमी करण्यात आलेली उत्पादन शुल्क सवलत डिसेंबपर्यंत विस्तारण्यात आली, मात्र आता महिंद्रचा कित्ता अन्य कंपन्याही गिरविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रच्या वाहन आणि आंतरराष्ट्रीय विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण शाह यांनी याबाबत म्हटले आहे की, गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही वाढीव दर राखून ठेवले होते, मात्र वाढत्या उत्पादित खर्चापोटी तूर्त हे दर स्थिर ठेवणे शक्य नाही. त्यामुळेच आम्ही वाहनांच्या किमती १० हजार रुपयांपर्यंत वाढविल्या आहेत.
महिंद्र समूहाबरोबरच टाटा मोटर्सनेही तिच्या विविध वाहनांच्या किंमती दोन टक्क्य़ांपर्यंत वाढविल्या आहेत. महिंद्रने अन्य वाहनांबरोबरच ट्रॅक्टरचेही दर वाढविले असताना टाटा मोटर्सने मात्र केवळ व्यापारी वाहनांचे दर वाढविल्याचे कंपनीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. कंपनी गेल्या महिन्यांपासूनच विविध व्यापारी वाहनांच्या किंमतींमध्ये फेरबदल करत असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले