मुंबई : महिंद्रा मनुलाइफ म्युच्युअल फंडाने फ्लेक्सी कॅप योजनेची घोषणा केली आहे. ही योजना गुंतवणुकीसाठी कायम खुली असलेली योजना आहे. फंडातील समभाग निवडीला बाजार भांडवली मर्यादा नसून सक्रिय व्यवस्थापित फंड आहे. विविध क्षेत्रातील कंपन्या निवडून दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीतून भांडवली वृद्धी साधण्याचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले. महिंद्रा मनुलाइफ फ्लेक्सी कॅप योजना टॉप-डाऊन आणि बॉटम-अप सिद्धांताचे पालन करून पोर्टफोलियो तयार करेल. योजनेत बाजार भांडवलाच्या कंपन्यांत गुंतवणूक करण्याची निधी व्यवस्थापकाला लवचीकता आहे. या फंडाची प्राथमिक विक्री ३० जुलै ते १३ ऑगस्टदरम्यान सुरू राहणार असून २५ ऑगस्टपासून फंडाच्या युनिटची नियमित खरेदी-विक्री सुरू होईल. निफ्टी टीआरआय ५०० हा या फंडाचा मानदंड निश्चित करण्यात आला आहे.

महिंद्रा मनुलाइफ म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष बिश्नोई म्हणाले की, करोनाची दुसरी लाट असूनही भारतीय भांडवली बाजाराने वरच्या दिशेने कूच केले आहे. मार्च २०२० च्या अखेरीस देशव्यापी टाळेबंदी घोषित झाल्यापासून निर्देशांक जवळपास दुप्पट झाले आहेत. तथापि, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या विविध अनिश्चिततेमुळे भविष्यात भांडवली बाजार अस्थिर राहण्याची शक्यता आहे. फ्लेक्सी कॅप फंड प्रकारात अस्थिर बाजारात स्थिर परतावा देण्याची क्षमता आहे. जोखीम आणि परतावादरम्यान संतुलन सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या वैविध्यपूर्ण रणनीती निधी व्यवस्थापकाला असलेल्या लवचीकतेमुळे शक्य असते.