09 April 2020

News Flash

महिंद्र, मारुतीची ‘व्हेंटिलेटर्स’ निर्मितीसाठी सज्जता!

हिंद्र अँड महिंद्रकडून ‘अ‍ॅम्बु बॅग’ म्हणून प्रचलित व्हेंटिलेटर्सची अद्ययावत आवृत्तीची निर्मिती ही ७,५०० रुपयांमध्ये केली जाणार आहे.

संग्रहित छायाचित्र

करोना विषाणूजन्य साथीविरोधात युद्ध छेडले गेले असताना, आघाडीच्या भारतीय वाहन निर्मात्या कंपन्या मारुती सुझूकी आणि महिंद्र अँड महिंद्रने या कामी देशाच्या आरोग्य व्यवस्थेला योगदान म्हणून व्हेंटिलेटर्सच्या निर्मितीसाठी सज्जता सुरू केली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या प्रसंगी जर्मनीची अग्रणी कारनिर्मात्या फोक्सव्ॉगनने तिचा उत्पादन प्रकल्पाचा शस्त्रास्त्र निर्मितीसाठी वापर सुरू केला होता, त्याच धर्तीचा हा पुढाकार मानला जात आहे.

महिंद्र अँड महिंद्रने या आघाडीवर पहिले पाऊल टाकले असून, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पवन गोएंका यांनी गुरुवारी ट्विप्पणीद्वारे कंपनीने तिच्या उत्पादन प्रकल्पांमध्ये  आखलेल्या व्हेंटिलेटर्सच्या निर्मितीच्या धोरणाची माहिती दिली. दोन स्तरावर हे धोरण राबविले जाणार असून, एकीकडे सध्या व्हेंटिलेटर्सची निर्मिती करणाऱ्या दोन सरकारी कंपन्यांना गतिमान उत्पादनासाठी अभियांत्रिकी मदत आणि दुसरीकडे स्वत:च ‘अ‍ॅम्बु बॅग’ म्हणून प्रचलित व्हेंटिलेटर्सची अद्ययावत आवृत्तीची निर्मिती कंपनीकडून केली जाणार आहे. कंपनीकडून निर्मित या अ‍ॅम्बु बॅगचा नमुना पुढील तीन दिवसात तयार केला जाईल. सरकारकडून त्याला मंजुरी दिल्या गेल्यास ताबडतोब उत्पादनही सुरू केले जाईल, असे गोएंका यांनी स्पष्ट केले.

विविध वैद्यक तज्ज्ञांच्या अहवालाप्रमाणे करोना साथीच्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात देश पोहोचला असून, बाधित रुग्णांच्या संख्येत वाढीसह सध्या अस्तित्वात असलेल्या वैद्यक व उपचार सुविधांवर मोठा ताण पडण्याची शक्यता बळावली आहे. अशा समयी तात्पुरती इस्पितळे जरी उभारली गेली तरी अतिदक्षता आवश्यक असलेल्या रुग्णांसाठी व्हेंटिलेटर्सचा तुटवडा मोठय़ा प्रमाणात भासेल. या सर्व शक्यतांना तोंड देण्यासाठी सज्जता म्हणून महिंद्र समूहाकडून सरकारला सर्व मदत केली जाईल, अशी ट्विप्पणी महिंद्र समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनीही गेल्या आठवडय़ात केली होती.

सरकारने मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि ह्य़ुंडाई या अन्य वाहन निर्मात्या कंपन्यांना जलद गतीने व्हेंटिलेटरच्या निर्मितीसाठी पावले टाकण्याचे आवाहन केले आहे. मारुती सुझुकी इंडियाचे लिमिटेडचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी याची कबुली देताना, कंपनीतील  वेगवेगळ्या तंत्रज्ज्ञांच्या संघांकडून या दिशेने प्रयत्न सुरू असून, पुढील दोन दिवसांत या संबंधाने आमचे ठोस उत्तर प्रस्तुत केले जाईल. अर्थात वेळ खूपच थोडा असून, वेगाने पावले टाकली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

दहा लाखांचा व्हेंटिलेटर अवघ्या ७,५०० रुपयांत

श्वसनरोगाने ग्रस्त रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये हवा आणि ऑक्सिजन फुंकू शकणारे व्हेंटिलेटर हे यांत्रिक साधन आहे. कोविड-१९ सारख्या फुफ्फुसातील गंभीर गुंतागुंत संभवणाऱ्या रुग्णांच्या उपचारांत व्हेंटिलेटरची महत्त्वाची भूमिका असेल. या अद्ययावत तंत्र-वैद्यक उपकरणांची सुमारे ८० ते ८५ टक्के गरज ही आयातीद्वारे भागविली जाते आणि एका व्हेंटिलेटर उपकरणाची किंमत ही पाच ते १२ लाख रुपयांदरम्यान आहे. त्या उलट महिंद्र अँड महिंद्रकडून ‘अ‍ॅम्बु बॅग’ म्हणून प्रचलित व्हेंटिलेटर्सची अद्ययावत आवृत्तीची निर्मिती ही ७,५०० रुपयांमध्ये केली जाणार आहे.

बजाज समूहाकडून १०० कोटींचा निधी

वाहन उद्योगातील १३० वर्षांचा वारसा असलेल्या बजाज समूहाने करोनाविरूद्धाच्या युद्धात सरकारला सहाय्य तसेच नागरिकांच्या आरोग्यनिगा व अन्य गरजांच्या पूर्ततेसाठी १०० कोटी रुपयांच्या निधीची कटिबद्धता व्यक्त केली आहे. सरकारी यंत्रणेबरोबरीनेच, समूहाशी संलग्न २०० हून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या जाळ्यामार्फत ही मदत गरजूंपर्यंत पोहचविली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2020 12:36 am

Web Title: mahindra marutis ventilators ready to build abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 सेन्सेक्सची १४११ अंशांची झेप, निफ्टी ८६०० पुढे
2 बँक कर्मचारी वाऱ्यावर; अखेर मुख्यमंत्र्यांना साकडे
3 कामगारांपासून ते महिलांपर्यंत, कुणाला काय मिळणार मदत? अर्थमंत्री सीतारमन यांच्या महत्त्वाच्या घोषणा
Just Now!
X