मुंबई : सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्या वित्तीय तसेच पतविषयक उपाययोजनांच्या परिणामी अर्थव्यवस्थेत नजीकच्या भविष्यात उभारीची विश्लेषकांची अपेक्षा आहे. म्हणूनच येणाऱ्या काळात म्हणून बाजार भांडवलानुसार अव्वल २५० कंपन्यांमधील गुंतवणूक लाभकारक ठरण्याची शक्यता असून, महिंद्र म्युच्युअल फंडाने याच पार्श्वभूमीवर ‘मिहद्रा टॉप २५० निवेश योजना’ गुंतवणुकीस खुली केली आहे.

या फंडाची विक्री शुक्रवारपासून सुरू झाली असून, ती २० डिसेंबपर्यंत सुरू असेल. ‘सेबी’च्या प्रमाणीकरणानुसार लार्ज आणि मिडकॅप गटात या फंडाचा समावेश केला गेला आहे. ८० ते १०० टक्के गुंतवणूक ही समभागांमध्ये तसेच समभागसंलग्न पर्यायांमध्ये असेल. ‘निफ्टी लार्ज मिडकॅप २५० इंडेक्स टीआरआय’ हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक म्हणून निर्धारित करण्यात आला आहे. युनिट्सच्या वितरणापश्चात पाच व्यवहार दिवसांनंतर या फंडात नियमित खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होतील.

बाजार भांडवलाचा ८९ टक्के हिस्सा व्यापणाऱ्या (३० जून २०१९ च्या आकडेवारीनुसार) अव्वल २५० कंपन्या हा या फंडाचा गुंतवणूक अवकाश आहे.

लार्ज कॅप समभागांतून गुंतवणुकीला स्थिरता आणि वृद्धीक्षम मिडकॅपद्वारे गुंतवणुकीत वाढ असे उद्दिष्ट राखून ‘मिहद्रा टॉप २५० निवेश योजने’चा पोर्टफोलियो आकाराला येईल, असे महिंद्र म्युच्युअल फंडाचे मुख्य विपणन अधिकारी जतींदर पाल सिंग यांनी सांगितले.