22 July 2019

News Flash

महिंद्रची ‘प्रगती ब्ल्यूचिप’ योजना खुली

फंड सरासरीपेक्षा अधिक वृद्धीदर राखणाऱ्या उद्योगातील निवडक कंपन्यात गुंतवणूक करेल.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : नवीन गुंतवणुकीस लार्ज कॅप समभागांचे सध्याचे मूल्यांकन आकर्षक आहे. लार्ज कॅप समभागांतील स्थिरता आणि तुलनेने कमी जोखमीसह परतावा कामगिरी पाहता महिंद्र म्युच्युअल फंडाचा ‘महिंद्रा प्रगती ब्ल्यूचिप योजना’ सद्य:स्थितीत गुंतवणुकीसाठी आदर्श ठरत असून, या योजनेत शुक्रवार, ८ मार्चपर्यंत गुंतवणूक करता येईल.

महिंद्र म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी आशुतोष बिश्नोई यांच्या मते, लार्ज कॅप समभागांमध्ये गुंतवणुकीसाठी हीच सुयोग्य वेळ आहे आणि नेमके याच वेळी लार्ज कॅप समभागलक्ष्यी या नव्या योजनेच्या प्रस्तुतीतून गुंतवणूकदारांना योग्य वेळी प्रदान केली गेलेली ही संधी आहे. उद्योग क्षेत्राच्या मिळकतीत वाढीसह एकंदर अर्थव्यवस्थेतही उभारीचे स्पष्ट संकेत आहेत.

निफ्टी५० निर्देशांकात सामील कंपन्यांचा डिसेंबर तिमाहीतील एकत्रित नफा हा ८०,००० कोटी रुपयांवर गेला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ५०,००० कोटी रुपये होता, असे बिश्नोई यांनी सांगितले. असे असूनही लार्ज कॅप समभागांचे मूल्यांकनही गुंतवणूकयोग्य पातळीवर असल्याची त्यांनी पुस्ती जोडली. महिंद्रा प्रगती ब्ल्यूचिप फंड हा ‘सेबी’च्या वर्गीकरणानुसार लार्ज कॅप फंड आहे. फंडाच्या गुंतवणूक परिघात बीएसई १०० निर्देशांकातील कंपन्या असतील.

फंड सरासरीपेक्षा अधिक वृद्धीदर राखणाऱ्या उद्योगातील निवडक कंपन्यात गुंतवणूक करेल. फंडाचा मानदंड ‘निफ्टी – टोटल रिटर्न इंडेक्स’ असून व्ही. बालसुब्रमण्यम हे या योजनेचे निधी व्यवस्थापक आहेत.

या योजनेत एकरकमी गुंतवणूक किमान ५,००० रुपयांपासून  करता येईल, तर किमान एसआयपी १,००० रुपयांपासून सुरू करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

First Published on March 7, 2019 1:01 am

Web Title: mahindra pragati bluechip yojana started