करोना-टाळेबंदीतून सावरू पाहणाऱ्या देशातील वाहन कंपन्यांनी श्रावणातील सणमालिका हेरण्याचा यत्न चालविला आहे. जुलैमधील वाढत्या वाहन विक्रीचे बळ मिळालेल्या कंपन्यांनी त्यांची बहुप्रतीक्षित वाहने या मोसमात सादर करण्याचा मनोदय जाहीर के ला आहे.

महिंद्र अँड महिंद्रने नवीन अवतारातील ‘महिंद्रा थर’चे स्वातंत्र्यदिनी अनावरण करण्याचे जाहीर केले आहे. ऑफरोड एसयूव्ही गटातील वाहन २०१० पासून रस्त्यांवर धावत आहे. या वाहनाचे सादरीकरण कंपनीच्या संकेतस्थळावरून, समाज माध्यमांवरून करण्यात येणार आहे.

नवागत किआ मोटर्सची सोनेट ही छोटय़ा गटातील हॅचबॅक ७ ऑगस्ट रोजी सादर करण्यात येणार आहे. तर टोयोटा किलरेस्कर मोटर्सने कॉम्पॅक्ट एसयूव्ही गटात शिरकाव करताना अर्बन क्रूझर लवकरच आणण्याचे बुधवारी स्पष्ट केले.

जुलैमध्ये वाहन विक्रीत सुधार

नवी दिल्ली : सलग चार महिन्यांच्या घसरणीनंतर देशातील प्रवासी वाहन विक्रीत अखेर गेल्या महिन्यात वाढ नोंदली गेली आहे. जुलैमध्ये मारुती सुझुकीसह अनेक वाहन कंपन्यांनी विक्रीतील वाढ अनुभवली आहे. करोना कालावधीतील टाळेबंदीचा फटका सहन करणारे हे क्षेत्र आता सावरू पाहत असल्याचे चित्र कंपन्यांच्या जुलैमधील वाहन विक्रीच्या आकडय़ांवरून स्पष्ट होत आहे. वाहनांसाठी विचारणा तसेच नोंदणी होण्याचे प्रमाणही या दरम्यान वाढले आहे. प्रवासी वाहन बाजारपेठेतील अव्वल, मारुती सुझुकीने जुलैमध्ये अवघ्या एक टक्के वाढीसह का होईना विक्री वाढ नोंदविली आहे.