गेल्या काही महिन्यांपासून कमी विक्रीचा सामना करणाऱ्या अवजड व व्यापारी वाहन निर्मितीसाठी नव्याने ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे महिंद्र समूहाने निश्चित केले आहे. या क्षेत्रात येत्या दोन वर्षांत आणखी वाहने भारतीय बाजारात उतरविण्याचेही कंपनीने ठरविले आहे.
१६.९ अब्ज डॉलर समूहाच्या महिंद्र अँड महिंद्रचा व्यापारी वाहनांचा व्यवसाय विभाग असलेल्या महिंद्र ट्रक आणि बस गटांतर्गत ९ ते १६ टन वजन क्षमतेची नवी व्यापारी वाहने विकसित करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्या व्यापारी वाहन विभागाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी राजन वधेरा यांनी दिली.
व्यापारी वाहन निर्मितीतील एक परिपूर्ण खेळाडू म्हणून होण्याचे महिंद्रचे स्वप्न असून सध्या नसलेल्या व्यापारी वाहन गटात उतरण्याचा मानसही वधेरा यांनी व्यक्त केला. एकूणच ६ ते ४९ टन वजन क्षमतेच्या वाहनांसाठी येत्या कालावधीत ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, असेही ते म्हणाले. अवजड प्रकारातील ४९ टन वजन क्षमतेच्या वाहनाची निर्मिती चालू वर्षअखेपर्यंत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या गटातील वाहनांना गेल्या काही कालावधीपासून असलेल्या कमी मागणीबाबत वधेरा म्हणाले की, येऊ घातलेल्या वस्तू व सेवा करामुळे व्यापारी वाहनांची मागणी पुन्हा वाढताना दिसेल; या विधेयकामुळे एकूणच माल वाहतूक क्षेत्रात वाढती हालचाल नोंदली जाईल. कंपनीने बुधवारीच तिच्या पुण्यानजीकच्या चाकण प्रकल्पात १५,००० वे अवजड वाहन तयार केले. कंपनीने हलक्या व्यापारी वाहनांचा १.२५ लाखाचा टप्पा पार केला आहे.