मुंबई : आभूषण विक्रेता शृंखला मलाबार गोल्ड अ‍ॅण्ड डायमंडने आपले रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत असताना महत्त्वाकांक्षी जागतिक विस्तार कार्यक्रम घोषित केला आहे. येत्या पाच वर्षांत विक्री दालनांची संख्या सध्याच्या २५० वरून तिप्पट वाढून ७५० वर, तर या नियोजनाप्रमाणे कंपनीची वार्षिक उलाढाल ५०,००० कोटी रुपयांची पातळी गाठणे अपेक्षित आहे.

भारतासह, आखाती देश, दक्षिण-पूर्व आशिया आणि अमेरिका यासह सध्या जगभरात १० देशांमध्ये या मलाबारची विक्रेता दालने कार्यरत आहेत. नियोजित विस्तारानुसार, कंपनी उत्तर आणि मध्य भारतातील वाढत्या दागिन्यांच्या बाजारपेठेला लक्ष्य करून, येथील सर्व प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी शहरांमध्ये अस्तित्व निर्माण करेल.

तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही बांगलादेश, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इजिप्त आणि तुर्कस्तान यांसारख्या नवीन भौगोलिक क्षेत्रात फैलाव अपेक्षित आहे. भारताबाहेरील कंपनीच्या व्यवसायाचा समूहाच्या एकूण उलाढालीत सुमारे ४० टक्क्यांपर्यंत वाटा असेल, असे मलाबार समूहाचे अध्यक्ष एम. पी. अहमद यांनी स्पष्ट केले.

या विस्तार आणि व्यवसाय वाढीवर कंपनीने ९६०० लाख अमेरिकी डॉलर (सुमारे ७,००० कोटी रुपये) गुंतविण्याचे निश्चित केले आहे.

या विस्तार नियोजनासह, मलाबार समूह आपल्या गुंतवणूकदारांचा पायाही २,७५२ इतक्या संख्येने विस्तारू पाहात आहे. ज्यात उत्तर आणि मध्य भारतातील राज्यांमधील गुंतवणूकदारांचा अधिक भरणा असेल, असे अहमद यांनी नमूद केले. नियोजित विस्तारापश्चात मलाबारच्या वेतनपटावर असलेले मनुष्यबळ सध्याच्या १३,००० वरून २५,००० असे होईल.