हमखास आणि चांगल्या मोबदल्याची नोकरीची हमी असतानाही, कुशल जोडारी (वेल्डर्स), पर्यवेक्षक आणि जोडकाम अभियंत्यांची संबंध देशात मोठय़ा प्रमाणावर कमतरता भासत असून, याची झळ प्रामुख्याने वाहन उद्योग, बांधकाम उद्योग, संरक्षण क्षेत्र आणि ऊर्जानिर्मिती उद्योगाला बसत आहे. जोडारीशास्त्र, तंत्रज्ञान तसेच या विषयात संशोधन व विकासासाठी कार्यरत संस्था ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ वेल्डिंग (आयआयडब्ल्यू)’च्या ढोबळ अंदाजाप्रमाणे औद्योगिकदृष्टय़ा प्रगत महाराष्ट्रात येत्या सात वर्षांत सुमारे दीड लाख जोडारी कारागिरांची तूट भासेल.
देशातील वाहन उद्योगात महाराष्ट्राचा वाटा ३३ टक्के आहे. देशी-विदेशी वाहन उत्पादकांचे पुणे, (पिंपरी, चिंचवड, चाकण) नाशिक, औरंगाबाद व नागपूर येथे प्रकल्प, तर त्याच परिसरात या उद्योगांना सुटे भाग (ओईएम) पुरवठादारांचे हजारो उद्योगही महाराष्ट्रात सर्वाधिक संख्येने आहेत आणि त्यात उत्तरोत्तर भर पडत आहे. या सर्वच ठिकाणी कुशल जोडारीची सेवा महत्त्वाची ठरते आणि केवळ वाहन आणि वाहनपूरक उद्योगक्षेत्रात २०२२ पर्यंत १.३५ लाख जोडारी कमी पडतील, असा आयआयडब्ल्यूचे अध्यक्ष आर. श्रीनिवासन यांचा कयास आहे. त्यांच्या मते राज्यातील वाहननिर्मिती उद्योगापुढे संकट स्पष्टपणे घोंगावत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमाणपत्रधारक कुशल जोडारी मिळविण्यासाठी अनेक उद्योगांना स्वयंपुढाकाराने आपल्या प्रशिक्षण संस्था अथवा शक्य असेल त्या आयटीआय व तत्सम प्रशिक्षण संस्थांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे पाऊल टाकले असल्याचे सोमण यांनी सांगितले. वार्षिक ३ लाखापासून ४० लाखांच्या वेतनमानावर प्रशिक्षितांना सेवेत सामावूनही घेतले जात आहे. मनुष्यबळ तुटीच्या समस्येचा वेध घेणारी राष्ट्रीय परिषद आणि वेल्ड इंडिया प्रदर्शनाचे आयआयडब्ल्यूने नवी मुंबई येथे ९ ते १२ डिसेंबर दरम्यान आयोजन केले. देशभरात १४ शाखांद्वारे कार्यरत आयआयडब्ल्यूनेही दरसाल २०,००० या प्रमाणे २०२२ पर्यंत प्रमाणपत्रधारक जोडारी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवून, सरकार, उद्योगक्षेत्र आणि प्रशिक्षण संस्था या दरम्यान समन्वयाची भूमिका बजावण्याचे ठरविले आहे.