News Flash

‘मराठय़ांनो, गरुडझेप घ्या’

एकेकाळी संपूर्ण भारतात पसरलेला आणि राज्यकर्ता असलेला मराठा समाज आज महाराष्ट्रापुरताच सिमीत झाला आहे. मराठा समाज लढवय्या असून मराठय़ांनो आता गरुडझेप

| October 14, 2014 12:52 pm

एकेकाळी संपूर्ण भारतात पसरलेला आणि राज्यकर्ता असलेला मराठा समाज आज महाराष्ट्रापुरताच सिमीत झाला आहे. मराठा समाज लढवय्या असून मराठय़ांनो आता गरुडझेप घ्यायला शिका, असे आवाहन ‘मराठा बिझनेसमेन फोरम’चे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार यांनी शुक्रवारी मुंबईत केले.
परळ येथील आयटीसी ग्रँण्ड सेट्रल हॉटेलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ‘मराठा बिझनेसमेन फोरम’चे उद्घाटन करण्यात आले. अॅड. पवार यांच्यासह उद्योजक-बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे, रवी सांवत आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते फोरमचे उद्घाटन झाले. गळ्यातील कंठा काढून देणारा आपला मराठा समाज आज याचना करतोय, समाजाचाही मराठय़ांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, असे सांगून अॅड. पवार म्हणाले, मराठे लढाईत जिंकतात आणि तहात मात्र हरतात. इतिहास निर्माण करणे आपल्या हातात असले तरी तो लिहिणे दुसऱ्यांच्या हातात असते. हे चित्र आता बदलण्याची गरज आहे. आता कोणापुढे हात न पसरता आपला हात देणारा झाला पाहिजे.
मराठा समाजासाठी काम करणाऱ्या विविध संस्थांना एकत्र आणून काही महिन्यांपूर्वी कामगार क्रीडा भवन येथे संमेलन भरविण्यात आले होते. सर्वानी संघटित होऊन काम करावे, असे ठरले आणि यातून ‘मराठा बिझनेसमेन फोरम’ची स्थापना झाली. आपला समाज उद्योग-व्यवसायात जास्तीत जास्त पुढे यावा, त्याची प्रगती व्हावी आणि केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशात आणि परदेशातही आपला व्यवसाय पसरावा, हा उद्देश या मागे असल्याचेही पवार यांनी सांगितले. हावरे म्हणाले की, उद्योग-व्यवसाय करायला खूप पैसा लागतो हा गैरसमज असून उद्योग आपल्या पैशांवर नव्हे तर दुसऱ्यांच्या पैशांनी करायचा असतो. स्वत:ला कधीही छोटे करू नका, मोठे आव्हान स्वीकारा. आयकर विभागाचे माजी मुख्य आयुक्त अरुण पवार म्हणाले, या फोरमच्या माध्यमातून विविध कल्पनांचे आदान-प्रदान आणि अनुभवांची देवाणघेवाण करून एकमेकांना मदत करू या. तर या फोरमचा उपयोग आपण जे मिळविले आहे ते आपल्या पुढच्या पिढीला देण्यासाठी केला जावा, अशी अपेक्षा रवी सावंत यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 12:52 pm

Web Title: maratha businessmen forum inaugurated
टॅग : Business News
Next Stories
1 ‘डीएलएफ’समोर धोक्याची घंटा!
2 व्होडाफोनचा अखेर विजय
3 औद्योगिक उत्पादन दर सुस्तावलेलाच!
Just Now!
X