मेमधील निर्देशांक २ टक्क्य़ांवर; व्याजदर कपातीची आशा अधिक भक्कम

किरकोळ पाठोपाठ घाऊक महागाई दरदेखील गेल्या महिन्यात ३ टक्क्य़ांखाली विसावला आहे. भाज्या, डाळींच्या किंमती घसरल्याने यंदा घाऊक महागाई दरात उसंत मिळाली आहे. किरकोळ तसेच घाऊक महागाई दर किमान स्तरावर आल्याने आता रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपातीबाबतची आशा अधिक विस्तारली आहे. मध्यवर्ती बँकेचे आगामी पतधोरण येत्या ऑगस्टमध्ये होत आहे.

गेल्याच आठवडय़ात किरकोळ महागाई दरही ३ टक्क्य़ांखाली आला होता. २०१२ नंतर प्रथमच हा दर किमान स्तरावर नोंदला गेला होता. यंदा घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर २.१७ टक्के नोंदला गेला आहे.

एप्रिल २०१७ मध्ये घाऊक महागाई दर ३.८५ टक्के होता. तर वर्षभरापूर्वीच्या मेमध्ये तो (-) ०.९ टक्के होता. यापूर्वीचा २.१० टक्के हा किमान महागाई दर हा डिसेंबर २०१६ मध्ये नोंदला गेला आहे. घाऊक महागाईमध्ये अॠ्नधान्याच्या किंमती २.२७ टक्क्य़ांनी खाली आल्या आहेत. तर भाज्यांचे दर (-) १८.५१ टक्क्य़ांपर्यंत घसरले आहेत. बटाटे व कांद्याचे दर अनुक्रमे ४४.३६ व १२.८६ टक्क्य़ांपर्यंत स्थिरावले आहेत.

मसाले व डाळींच्या किंमती अनुक्रमे ४.१५ व १९.७३ टक्क्य़ांनी कमी झाल्या आहेत. अंडी, मटण व मासे यांचे दर १.०२ टक्क्य़ांपर्यंत घसरले आहेत. फळांच्या किंमती (-) ०.७३ टक्क्य़ांनी कमी झाल्या आहेत.

वाढत्या महागाईमुळे रिझव्‍‌र्ह बँकेने चालू महिन्याच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या पतधोरणात व्याजदरात कपात केली नव्हती. महागाईच्या भितीमुळे चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या द्विमासिक पतधोरणातही व्याजदर स्थिर ठेवण्यात आले होते.

आता दोन्ही प्रमुख महागाई दर किमान स्तरावर असताना रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर कमी करायला हवे, अशी आवश्यकता उद्योग क्षेत्रातून मांडली जात आहे. एप्रिलमधील औद्योगिक उत्पादन दरही कमी झाल्याने अर्थविकासाला चालना देण्यासाठीही यंदा व्याजदर कपात हवी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.