17 December 2017

News Flash

लिक्विड फंडात गुंतवणूक ‘बोनस’रूपाने व्हावी!

अर्थसूज्ञतेच्या फराळाची ही तिसरी थाळी..

डॉ. रेणू पोथेन | Updated: October 12, 2017 2:01 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

दिवाळीच्या निमित्ताने लोकसत्ताने गुंतवणूकदारांसाठी योजलेला अर्थसूज्ञतेच्या फराळाची ही तिसरी थाळी..

कर्मचाऱ्याने वर्षभर कंपनीसाठी केलेल्या कष्टाची पावती आणि कौतुकाने पाठीवर मारलेली थाप म्हणजे दिवाळीला मिळालेला बोनस. या बोनसचा विनियोग योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. अनेकदा असे दिसून येते की, बोनस बचत खात्यात तसाच पडून राहतो आणि त्यावर फक्त वार्षिक ३.५ टक्के व्याज मिळते. कष्टाने कमावलेल्या पैशाला साजेसे कोंदण देणे गरजेचे आहे. यासाठी मिळालेला बोनस सर्वप्रथम लिक्विड फंडात जाणे गरजेचे आहे. लिक्विड फंडातील गुंतवणूक मुळीच धोकादायक नसते. प्रामुख्याने तात्पुरत्या स्वरूपाची गुंतवणूक लिक्विड फंडात करायला हवी. ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचे बचत खाते असते त्याप्रमाणे प्रत्येक म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचे एक तरी लिक्विड फंड हवे. यासाठी आमची पसंती ‘फ्रँकलिन इंडिया ट्रेझरी मॅनेजमेंट अकाऊंट’ आणि ‘अ‍ॅक्सिस लिक्विड फंडा’ला आहे.

जे कोणी केवळ बँकेच्या मुदत ठेवी आणि पीपीएफमध्येच (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी) गुंतवणूक करतात. त्यांनी ‘एसआयपी’चा पर्याय अजमावून बघायला हवा. नक्की कोणत्या फंडात एसआयपी सुरू करायची हे निश्चित करण्यासाठी तुम्ही जोखीम चाचणी करणे गरजेचे असते. जोखीम चाचणीतील निष्कर्षांनुसार गुंतवणूकदाराचा आदर्श ‘पोर्टफोलिओ’ ठरतो. या आदर्श ‘पोर्टफोलिओ’मध्ये रोखे गुंतवणूक आणि समभाग गुंतवणूक करणारे लार्ज कॅप, मिड कॅप, मायक्रोकॅप, ईएलएसएस सेक्टरल यांचे प्रमाण निश्चित होते. पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी लार्ज कॅप किंवा मल्टी कॅप फंडाची निवड करणे हिताचे असते. लार्ज कॅप फंडासाठी आमची शिफारस ‘आयसीआयसीआय प्रु. फोकस्ड ब्लुचिप’ आणि ‘एसबीआय ब्लुचिप फंडा’ला आहे. जे कोणी मल्टी कॅप फंडाचा विचार करू इच्छितात त्यांच्यासाठी कोटक सिलेक्ट फोकस्ड आणि ‘आयडीएफसी प्रीमियर इक्विटी फंडा’चा विचार करावा. मिड कॅप फंडासाठी ‘कॅनरा रोबेको इमर्जिग इक्विटीज’ आणि ‘फ्रँकलिन इंडिया प्रायमा’ची शिफारस आहे. स्मॉल कॅप फंडाचा विचार करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘रिलायन्स स्मॉल कॅप फंडा’ची शिफारस करीत आहोत. ज्या कोणाला सेक्टरल फंडात गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी ‘आयसीआयसीआय प्रु. बँकिंग अँड फिनॅन्शिअल सव्‍‌र्हिसेस फंड’ आणि ‘कॅनरा रोबेको इन्फ्रास्ट्रक्चर फंडा’ची शिफारस करता येईल.

ज्या कोणाला सगळा बोनस म्युच्युअल फंडात गुंतवायचा आहे त्यांना एक धोक्याची जाणीव करून द्यावीशी वाटते. सर्वसाधारणपणे मागील परतावा पाहून गुंतवणूक करण्याची मानसिकता असलेल्यांना सेबी देत असलेला इशारा लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मागील परतावा भविष्यातील परताव्याची खात्री देत नाही. मागील वर्षभराचा परतावा आकर्षक असल्याने एकरकमी गुंतवणूक करण्याची चूक घडू नये यासाठी धोक्याच्या इशाऱ्याची जाणीव करून द्यायला हवी. बाजाराची सध्याची पातळी पाहता नवीन गुंतवणूक किमान सहा महिने ते एक वर्ष कालावधीच्या एसटीपी किंवा एसआयपी पद्धतीने करणे फायद्याचे ठरेल. ज्यांची गुंतवणूक म्युच्युअल फंडात सुरू आहे अशा गुंतवणूकदारांनी एसआयपी वाढवावी. चांगल्या सल्लागाराच्या मदतीने वेगवेगळ्या आर्थिक उद्दिष्टांसाठी वेगवेगळे पोर्टफोलिओ तयार करायला हवेत. करनियोजन हीसुद्धा एक महत्त्वाची बाब असून बोनसचा चांगला विनियोग करनियोजनासाठी कराव्या लागणाऱ्या गुंतवणुकीसाठी करता येऊ  शकेल. करनियोजनासाठी ईएलएसएस फंडाचा विचार करताना पसंती ‘डीएसपी ब्लॅकरॉक टॅक्स सेव्हर’ आणि ‘अ‍ॅक्सिस लाँग टर्म इक्विटी’चा विचार करावा.

शेवटचे, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजपर्यंत टर्म प्लानची खरेदी केली नसेल तर टर्म प्लान हा वित्तीय नियोजनाचा अविभाज्य भाग असल्याने बोनसचा यापेक्षा चांगला विनियोग असू शकणार नाही.

First Published on October 12, 2017 2:01 am

Web Title: marathi articles on liquid fund investment