वित्तीय सेवा उद्योगात तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये लक्षणीय वाढ प्रकर्षांने दिसून येते. स्वत:च्या आर्थिक उत्कर्षांच्या दिशेने लोकमानसातील आशावादी बदल हा वित्तीय सेवांसाठी मजबूत ग्राहकवर्गाच्या वाढीस हातभार लावणारा ठरला आहे. म्युच्युअल फंड उद्योगही तंत्रज्ञान-अवलंबातून त्याचा पुरेपूर प्रत्यय देत आहे.

तंत्रज्ञान सर्वव्यापी आहे आणि आपल्या आयुष्यातील जवळजवळ प्रत्येक पैलूमध्ये तंत्राविष्कार आपल्याला आज पाहायला मिळतो. भारत आज डिजिटल क्रांतीच्या उंबरठय़ावर आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सरकारने राबविलेल्या निश्चलनीकरणाच्या प्रक्रियेचे हे फलित असल्याचे म्हटले जाते. देशाला रोखरहित अर्थव्यवस्थेमध्ये परावर्तित करण्याचा चंग बांधून सुरू झालेल्या या मोहिमेने, डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित अनेक उपक्रम वित्तीय व्यवस्थेत सुरू करण्यात आले. तंत्रज्ञान हे सबळीकरणाचे साधन बनले आहे आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी वाढत्या प्रमाणात या बळाचा अवलंब वाढविल्याचे दिसून येत आहे. म्युच्युअल फंड क्षेत्रही याला अपवाद राहिलेले नाहीत. म्युच्युअल फंडात उलाढाल, या व्यवहारांची प्रक्रिया, निधी व्यवस्थापन, ग्राहक सेवा अथवा वितरण हे सर्व आता डिजिटल मंचावर साकारले जात आहे. मालमत्ता व्यवस्थापकांना त्यांच्या व्यवसाय ढाच्याला योग्य ते आकार देण्यास तसेच महत्त्वाची कार्ये प्रमाणित करून त्यावर लक्ष केंद्रित करण्यास तंत्रज्ञानानेच मदतीचा सढळ हात पुढे केला आहे.

म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीचे फायदे आणि बारकावे याबद्दल गुंतवणूकदारांमध्ये जनजागराव्यतिरिक्त, म्युच्युअल फंड उद्योग आपली संपूर्ण प्रणाली अधिक कार्यक्षम व विनासायास बनविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या भूमिकेबद्दल अधिकाधिक सजग बनला आहे. ग्राहकाचा अनुभव सोयीस्कर आणि सकारात्मक बनविणे हा उद्योगासाठी अग्रक्रम बनला आहे. त्या संदर्भात  गेल्या काही वर्षांपासून उद्योगाने अनेक उपक्रम राबवले आहेत.

  • व्यवहार सुलभता : जलद, कार्यक्षम आणि कागदरहित व्यवहार सक्षम करण्यासाठी, म्युच्युअल फंड उद्योगाने झटपट गुंतवणूक-पत्र (फोलिओ) निर्मिती आणि तात्काळ व्यवहारक्षमता प्रदान करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. वैध कागदपत्रे असलेल्या ऑनलाइन बँकिंग सुविधेचा उपयोग करणारा एखादा गुंतवणूकदार अगदी काही मिनिटांमध्ये म्युच्युअल फंडात व्यवहार करू शकतो. हे व्यवहार वेबस्थळ किंवा मोबाइलचा वापर करून केले जाऊ  शकतात.
  • मोबाइल अ‍ॅप्स अर्थात चालता-फिरता गुंतवणूक : गुंतवणूकदारांना त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास मदत करणाऱ्या अ‍ॅप्लिकेशन्सचा सध्या वित्तीय बाजारपेठेत ऊत आला आहे. या नवप्रयोगांनी केवळ व्यवहार सक्षम केले नाहीत, तर गुंतवणूकदारांना मालमत्ता विभाजन आणि त्यांच्या पोर्टफोलिओचे मूल्य याबाबतही माहिती प्रदान केली आहे. याशिवाय गुंतवणूकदार आपल्या उलाढालींचा मागोवा आणि ई-मेलद्वारे किंवा पोस्टद्वारे खाते विवरण मिळवू शकतात. लक्ष्य-आधारित गुंतवणुकीला मदत करण्यासाठी या अ‍ॅप्लिकेशनमध्ये विविध गुंतवणूक पर्याय आणि आर्थिक गणक – कॅलक्युलेटरचा अंतर्भाव केलेला असतो. या उद्योगातील अनेक फंड घराण्यांनी आपल्या मोबाइल अ‍ॅपमध्ये गुंतवणुकदारांना त्वरित रोख रकमेची आवश्यकता लक्षात घेऊन इन्स्टंट रिडम्प्शनची सोय केली आहे.
  • ग्रामीण भागात विस्तार वाढवण्यासाठी, काही फंड घराण्यांकडून गुंतवणूकदारांना एसएमएस-आधारित गुंतवणुकीचा पर्याय खुला केला गेला आहे. एसएमएस-आधारित म्युच्युअल फंड गुंतवणुकीची प्रक्रिया सोपी आहे आणि विशेष म्हणजे वापरकर्त्यांकडे स्मार्टफोन किंवा वेगवान इंटरनेट जोडणी असणेही आवश्यक नाही.
  • वितरण सोय : अनेक वित्तीय कंपन्यांनी ई-विक्रेत्यांद्वारे ऑनलाइन उत्पादने बाजारात उपलब्ध करून देण्याची शक्यता अजमवायला सुरुवात केली आहे. मोठय़ा बाजारपेठेत शिरकावासाठी सोपे जावे हा यामागे हेतू आहे. अप्रसारित आणि अवांच्छित राहिलेल्या बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक फंड घराण्यांच्या विक्रेत्यांनी स्मार्टफोन आणि टॅब्लेटचा वापरदेखील सुरू केला आहे. या साधनांद्वारे विक्री व संपर्क बिंदूंमध्ये संख्यात्मक विस्तारासह एकंदर व्यवहार प्रक्रियाही गतिमान बनविली आहे. स्मार्टफोन आणि टॅब्लेट्सच्या वापरामुळे विक्रेत्यांना विविध उत्पादने आणि त्यांच्या लाभांविषयी ग्राहकांना शिक्षित करून मदत करणे शक्य बनविल्यामुळे त्यांच्या कामगिरीवरही गुणात्मक प्रभाव पाडला आहे.
  • विपणन : सोशल नेटवर्किंग व्यासपीठ हे सर्व क्षेत्रातील कंपन्यांसाठी विपणनाचे अल्पखर्चीक माध्यम म्हणून उदयास आले आहेत. गुंतवणूकदारांशी संवाद स्थापित करण्यासाठी आणि ब्रँड मूल्यवर्धनाच्या उद्देशाने फंड घराणीही या आघाडीवर खूप सक्रिय झाली आहेत. यातील नवीनतम प्रवाहामध्ये संभाव्य ग्राहकांशी संधान साधण्यासाठी, त्यांना प्रभावित करण्यासाठी तसेच शिक्षित करण्याचे एक साधन म्हणून जीआयएफचा (ग्राफिक्स इंटरचेंजेबल फॉरमॅट) चा वापर चपखलपणे केला जात आहे.
  • निधी व्यवस्थापन : डिजिटल प्रयोगांतून पोर्टफोलिओ व्यवस्थापनाच्या रुळलेल्या वाटेवर मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. आदर्श प्रारूपावर आधारित सक्रिय, निष्क्रिय निधी व्यवस्थापन आणि एक्स्चेंज ट्रेडेड फंड यांचे सध्या वाढत्या तंत्रज्ञानाद्वारे परिचालन केले जात आहे. विविध मालमत्ता वर्गामध्ये उचित प्रमाणात गुंतवणूक पातळी कायम राखण्यासाठी एल्गोरिदमचा वापर सर्रासपणे सध्या केला जातो. निधी व्यवस्थापन आणि त्याच्या संचालन प्रक्रियेत डिजिटल प्रक्रियांच्या अंमलबजावणीमुळे केवळ परिचालनात्मक खर्चामध्ये घट झाली इतकेच नव्हे तर पारदर्शकता व कार्यक्षमताही वाढली आहे.

कार्तिकराज लक्ष्मणन

(लेखक बीएनपी परिबा म्युच्युअल फंडाचे वरिष्ठ निधी व्यवस्थापक आहेत.)