22 November 2017

News Flash

मराठी उद्योजकांचा ‘सहभाव’ जोखणारी दोन दिवसांची ‘लक्ष्य २०२०’ परिषद

येत्या ९ आणि १० फेब्रुवारी असे दोन दिवस दादर (पूर्व) येथील राजा शिवाजी विद्यालय

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 2, 2013 2:20 AM

येत्या ९ आणि १० फेब्रुवारी असे दोन दिवस दादर (पूर्व) येथील राजा शिवाजी विद्यालय येथे आयोजित ‘लक्ष्य २०२०’ या परिषदेत मराठी उद्योगपताकेच्या संपन्नता व श्रीमंतीचा कस लागण्याबरोबरच, या उद्योजक मराठी मंडळीमध्ये परस्परांना सहाय्य करण्याच्या भावनेचीही कसोटी लागणार आहे. राज्याच्या विविध विभागातून परिषदेला येऊ इच्छिणाऱ्यांचा आजवरचा वाढता प्रतिसाद मात्र उत्साहवर्धक असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्राचे वन तसेच मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते शनिवारी, ९ फेब्रुवारीला सकाळी ‘लक्ष्य २०२० परिषदेचे उद्घाटन होत आहे. मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाने या महत्त्वांकांक्षी परिषदेचे आयोजन केले असून मंडळाचे कार्याध्यक्ष अनंत भालेकर हे ‘लक्ष्य २०२०’च्या यशस्वितेबद्दल आश्वस्त आहेत. परिषदेला राज्यभरातून २००० हून अधिक प्रथितयश उद्योजक, नव उद्योजक आणि उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांचा प्रतिसाद मिळेल असे त्यांनी सांगितले. प्रथमच या मंडळींना हे एक व्यापक व्यासपीठ लाभत असून, त्या निमित्ताने उद्योगाच्या उत्कर्षांसाठी, नवीन विस्ताराच्या संधीसाठी, जोडधंद्यासाठी संधी व संपर्कजाळे त्यांना निर्माण करता यावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निर्मिती क्षेत्रात कार्यरत मराठी उद्योजक, प्रक्रियादार, निर्यातदार, कच्चा मालाचे पुरवठादार, छोटे-मोठे दुकानदार-विक्रेते, व्यापारी परिषदेसाठी येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी व्यावसायिक उद्योजक-व्यापारी मित्रमंडळाने आयोजित केलेल्या या परिषदेच्या दोन दिवसात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा-मार्गदर्शन होणार आहे. परिषदेसाठी प्रतिनिधींची नोंदणी जोमाने सुरू असून ‘www.marathivyapari.com’ या संकेतस्थळावरील वाढती वर्दळ परिषदेसंबंधी  उत्सुकता दर्शविते, असे अनंत भालेकर यांनी सांगितले. मंडळाच्या दादरच्या कार्यालयात प्रत्यक्षात येऊन तसेच ई-मेल : marathivyapari@vsnl.net  आणि info@marathivyapari.com वरही मोठय़ा प्रमाणात चौकशी व नोंदणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. परिषदेच्या दोन दिवसात मराठी उद्योगक्षेत्राच्या जिव्हाळ्याची एकूण आठ सत्रांमध्ये चर्चाविमर्श होणार आहे. पहिल्या दिवशी उद्घाटन सत्रांतच ‘थेट परदेशी गुंतवणूक’ हा महत्त्वाचा विषय आहे, तर वितरण, कच्चा माल, जागतिक बाजारपेठ, व्यवसायपद्धतीत बदलाची गरज, सेवा उद्योग, उद्योजकांची सामाजिकदायित्व, ब्रॅण्डिंग वगैरे मराठी उद्योगविश्वाला नवीन क्षितिज गाठण्याची उमेद जागविणाऱ्या विविध सत्रांमध्ये विविध तज्ज्ञ व अनुभवी मराठी वक्त्यांनी आपला सहभाग कळविला असल्याचे त्यांनी सांगतिले.

अनंत भालेकर, कार्याध्यक्ष
उद्योगक्षेत्रात सध्या नगण्य असलेला मराठी टक्का वाढावा इतकेच नव्हे तर या मंडळींनी मोठी स्वप्ने पाहून आपल्या उद्यम कतृत्वाचे क्षितिज परस्पर सहकार्यातून उंचावत न्यावे हे या परिषदेचे फलित ठरेल.

First Published on February 2, 2013 2:20 am

Web Title: marathi industrialist meet in lakshya 2020 conference