ग्रामीण भारताचा ‘डिजिटल इंडिया’शी दुवा

मुंबई : ग्रामीण भागाची डिजिटल जगत आणि माहिती युगाशी वाजवी किमतीत आणि शाश्वत स्वरूपात नाळ जुळवून देण्याचा दावा करीत, मर्काटेल या नोएडास्थित कंपनीने राज्यभरात सर्वत्र स्वस्तात वायफाय सुविधा साकारण्याचे नियोजन आखले आहे. राज्यभरात ६५,००० वायफाय हॉटस्पॉट्स स्थापण्याचे कंपनीचे व्यावसायिक लक्ष्य आहे.

ई-व्यापारासह विविधांगी व्यवसाय स्वारस्य असलेल्या लामार्का समूहाने ब्ल्यूटाऊन इंडिया या तंत्रज्ञान कंपनीशी सामंजस्य साधून मर्काटेल या नावाने हा वायफाय सुविधेच्या सार्वत्रिकीकरणाचा उपक्रम हाती घेतला आहे. लामार्का समूहाचे अध्यक्ष नारायणन राजागोपालन यांनी फ्रँचाइझ तत्त्वावरील व्यावसायिक उपक्रमावर ५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील प्रचार-प्रसार आणि जाहिरातींवर आणखी चार कोटींच्या गुंतवणुकीचे नियोजन असल्याचे ते म्हणाले.

राज्यात ३६ जिल्ह्य़ांतील साडेअकरा लोखसंख्येपर्यंत इंटरनेट पोहचवायचे झाल्यास, तब्बल ४,४२,३७६ वायफाय हॉटस्पॉट्स उभारावे लागतील. त्यांपैकी १५ टक्के लक्ष्य साकारायचे झाल्यास, पुढील १८ महिन्यांत किमान ६५ हजार हॉटस्पॉट टॉवर उभारण्याचे आपण ठरविले असल्याचे राजागोपालन म्हणाले.

भारत ही जगातील दुसरी मोठी दूरसंचार बाजारपेठ असून, सरकारचा डिजिटलीकरणावरील भर हा या उद्योगक्षेत्रासाठी प्रोत्साहक ठरत आला आहे. याला धरूनच ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत बिनतारी इंटरनेट जोडणीचा हा उपक्रम असल्याचे राजागोपालन म्हणाले. दरमहा ९० रुपये ते कमाल ९९९ रुपये अशा किमतीत ग्राहकांना मर्काटेलमार्फत वेगवान इंटरनेट जोडणी मिळविता येईल. स्थानिक जनतेचे सबलीकरण, फ्रँचाइझ मॉडेल असल्याने उद्यमशीलतेला चालना, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक समानता या तत्त्वाने मर्काटेलचा हा उपक्रम चालणार असल्याचे ते म्हणाले. प्रति टॉवर किमान चार जणांना रोजगार या तऱ्हेने १८ महिन्यांत अडीच लाख रोजगारनिर्मिती राज्याच्या ग्रामीण भागात होईल, असा त्यांनी अंदाज वर्तविला. तरी प्रत्येक हॉटस्पॉट टॉवरमागे किमान ४०० ग्राहक या तऱ्हेने या सेवेचे २.६० कोटी ग्राहकवर्ग मर्काटेलला निर्माण करता येईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.