भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या येत्या महिन्यात होऊ घातलेल्या पतधोरणात यंदा व्याजदर कपातीची आशा पुन्हा एकदा उंचावली आहे. देशातील घसरता औद्योगित उत्पादन दर आणि कमी होत असलेली महागाई यापोटी मध्यवर्ती बँकेला अर्थव्यवस्थापूरक निर्णय घ्यावा लागेल, असा दबाव निर्माण होत आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी पतधोरण येत्या २ जून रोजी जारी होत आहे. बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी २०१५ मध्ये आतापर्यंत दोन वेळा प्रत्येकी पाव टक्क्य़ाची दर कपात केली आहे. ती पतधोरणबाह्य़ कपात होती; तर मुख्य धोरणात कोणताही बदल करण्यात आला नव्हता.
एप्रिलमधील किरकोळ महागाईचा दर ४.८७ टक्के नोंदला गेल्याचे मंगळवारीच जाहीर झाले. हा दर गेल्या चार महिन्याच्या किमान स्तराव आला आहे. गेल्या अनेक महिन्यानंतर तो ५ टक्क्य़ांच्या आत विसावला आहे. तर देशातील औद्योगिक उत्पादन दरही मार्चमध्ये २.१ टक्के असे किमान नोंदले गेले आहे. गेल्या पाच महिन्यातील हे उत्पादन चिंताजनक स्थितीत आले आहे.
आर्थिक सुधारणाच्या दिशेने सरकारची निर्णय पावले पडत असतानाच रिझव्‍‌र्ह बँकेनेही त्यावर अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे मत उद्योग जगतातून मांडले जात आहे.
भारतीय औद्योगिक महासंघाचे (सीआयआय) महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांच्या म्हणण्यानुसार, कमी होत असलेली महागाई व्याजदर कमी करण्यास पुरेशी आहे. यामुळे व्यापारी बँकांनाही व्याजदर कमी करण्यास प्रोत्साहन मिळेल व त्यामुळे विकासाला चालना दिली जाईल, असेही ते म्हणाले.
फिक्की या अन्य उद्योग संघटनेच्या अध्यक्षा ज्योत्सा सुरी यांनीही असेच काहीसे मत रिझव्‍‌र्ह बँकेबाबत व्यक्त केले आहे. देशातील निर्मिती अवस्था अद्यापही चिंताजनक असून चढय़ा व्याजदरांमुळे पायाभूत सेवा क्षेत्रातील अडचणी कायम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशांतर्गत व निर्यातीतील कमी मागणी ही चिंताजनक असून येत्या काही महिन्यांमध्ये विकासाला चालना द्यावयाची झाल्यास व्याजदर कमी होणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. राजन यांनी यापूर्वी दर निश्चित समितीतील अधिकतर अधिकाऱ्यांचा दर कपातीची शिफारस बाजुला ठेवत व्याजदर ‘जैसे थे’ ठेवले होते. तर पतधोरणबाह्य़ त्यांनी आतापर्यंत अध्र्या टक्क्य़ाची कपात केली आहे. आगामी मान्सूनबद्दल चिंता व्यक्त करत महागाई कमी झाल्यास व्याजदरात कपात केली जाईल, असे संकेत त्यांनी नव्या पतधोरणासाठी दिले यापूर्वीच दिले.