मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी शेवटच्या सत्रात कोसळून २५,००० च्या खाली जाऊन पोहचला. जागतिक पातळीवर विकासदराबद्दल असलेले चिंतेचे वातावरण, परकीय गुंतवणूकदारांनी बाजारातून काढून घेतलेले भांडवल आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढविण्याची शक्यता अशा तिहेरी घटकांमुळे सेन्सेक्स गेल्या १५ महिन्यांतील २४,८९३.८ या निच्चांकी पातळीवर जाऊन पोहचला. विशेष गोष्ट म्हणजे मोदी सरकारने सत्तारोहण केल्याच्या दिवशी बाजार याच पातळीच्या जवळपास म्हणजे २४,७१६ वर बंद झाला होता. मोदी सरकारने सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था जोमाने विकास करेल, असा अनेकांचा होरा होता.
तत्पूर्वी शेवटच्या सत्रात चिंतेच्या वातावरणामुळे बाजारातील गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. त्यामुळे सेन्सेक्स २५,००० ची महत्त्वपूर्ण पातळी ओलांडून २४,८९३.८ वर जाऊन पोहचला. त्याचबरोबर चीनमधील मंदीच्या वातावरणाचाही परिणाम गुंतवणूकदारांवर पहायला मिळाला. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रूपयाचे अवमुल्यन होऊन तो दोन वर्षांपूर्वीच्या ६६.८३ या पातळीवर जाऊन पोहचला.