करोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनचा फटका बसल्यानं अर्थव्यवस्था मंदावली होती. करोनाच्या संकटानं डोकं वर काढल्यानंतर शेअर बाजारातही पडझड नोंदवली गेली. दरम्यान, करोनाचा सामना करताना अर्थसंकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सायंकाळी २० लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली. या घोषणेनंतर शेअर बाजारात उत्साह दिसून आला. सकाळच्या सत्रात १००० अंकांची उसळी घेत निर्देशांक ३२,३०६.५४ वर पोहोचला.

देशाची अर्थव्यवस्था रुळांवर आणण्यासाठी २० लाख कोटींची आर्थिक मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. “करोनाच्या संकटामुळे ठप्प झालेले आर्थिक व्यवहार हळूहळू सुरू झाले असले, तरी रोजगारनिर्मिती करणाऱ्या विविध उद्योगांसाठी केंद्राने आर्थिक मदत देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. यासंदर्भात गेल्या आठवडय़ात निरनिराळ्या क्षेत्रांतील प्रतिनिधींशी चर्चाही केली. भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी आर्थिक मदत जाहीर करत असून, हा निधी देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या दहा टक्के आहे. त्याची बुधवारपासून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सविस्तर माहिती देतील, असे मोदींनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या घोषणेचा परिणाम गेल्या काही दिवसांपासून निरुत्साह पसरलेल्या शेअर मार्केटवर दिसून आला. मोदींच्या पॅकेजचं स्वागत करत शेअर बाजारानं पहिल्या सत्राच्या सुरूवातीलाच उसळी घेतली. सेन्सेक्सनं ९३५.४२ अंकांची झेप घेतली. निफ्टीही वधारला असून, २३० अंकांची वाढ होत ९,४०० वर पोहोचला आहे.