मुंबई : थकीत रक्कम भरण्याचे फर्मान असलेल्या दूरसंचार कंपन्यांवरील कारवाईबाबत ‘आस्ते कदम’ घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार विभागाला दिलेल्या सूचनेचा दिलासा गुरुवारी भांडवली बाजाराला मिळाला. त्यामुळे सलग तीन व्यवहारापासून घसरण नोंदविणाऱ्या मुंबई निर्देशांकाला तेजीसह उसंत घेता आली. तर चार सत्रातील घसरणीतून निफ्टीलाही आठवडय़ाच्या चौथ्या व्यवहारात विश्रांती मिळाली.

सेन्सेक्स २७१.०२ अंशांनी वाढून ४१,३८६.४० वर पोहोचला. सत्रात त्याचा प्रवास ४१,०९८.९१ ते ४१,४१३.९६ दरम्यान राहिला, तर ७३.४५ अंश वाढीसह निफ्टी १२,१८०.३५ पर्यंत स्थिरावला. चालू आठवडय़ात सेन्सेक्स सलग तीन व्यवहारात तर निफ्टी सलग चार व्यवहारात घसरला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने थकीत रक्कम भरण्यासाठी आठवडय़ाची मुदत दिलेल्या दूरसंचार कंपन्यांवर कारवाईबाबत सुधारित याचिकेवरील निर्णयाची प्रतीक्षा करावी असे दूरसंचार विभागाने स्पष्ट केल्याने एकूणच भांडवली बाजारात गुरुवारी खरेदीचे वातावरण होते. खुद्द भारती एअरटेलच्या समभागाचे मूल्य १.८० टक्क्यांनी वाढले. तर गेल्या तिमाहीत नफ्यातील तब्बल १५ टक्के वाढ नोंदविणारा लार्सन अँड टुब्रोचा समभाग जवळपास ३ टक्के वाढीसह मुंबई निर्देशांकात अव्वल ठरला.

सेन्सेक्समधील स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्र बँक, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, मिहंद्र अँड महिंद्र, टायटन कंपनी, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट आदींचे मूल्य वाढले. तर टेक महिंद्र, पॉवरग्रिड, टीसीएस, बजाज ऑटो, रिलायन्स इंडस्ट्रिज, मारुती सुझुकी आदी मुंबई निर्देशांकाच्या घसरणीच्या यादीत राहिले.

मुंबई शेअर बाजारातील सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढले. तर मिड कॅप आणि स्मॉल कॅप प्रत्येकी एक टक्क्यापर्यंत वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झालेल्या खनिज तेलाच्या स्थिरावलेल्या किमतीचीही दखल गुरुवारी भांडवली बाजारात घेतली गेली.