बँकांच्या समभागांना विक्रीचा दणका बसल्याने भांडवली बाजारात निर्देशांकांना घसरणीला सामोरे जावे लागले. तर तेल आयातदारांकडून विदेशी चलनाची मागणी वाढल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत तब्बल ४४ पैशांची मोठी आपटी रुपयाला सोसावी लागली.

चीन आणि युरोपीय राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेसंबंधी महत्त्वाच्या आकडेवारीच्या खुलाशाच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही ठिकाणच्या भांडवली बाजारात संमिश्र वातावरण होते. तरी गुरुवारच्या व्यवहाराची स्थानिक बाजारात सकारात्मक सुरुवात झाली. तथापि नंतर पुढे आलेल्या आयएचएस मार्किटच्या सेवा क्षेत्राविषयक सलग सहाव्या महिन्यात घसरण दर्शविणाऱ्या मासिक सर्वेक्षणाच्या आकडेवारीने बाजाराचा मूड नकारार्थी बनल्याचे दिसून आले.

त्यानंतर सुरू झालेल्या विक्रीचा सर्वाधिक फटका बँका व वित्तीय सेवा क्षेत्रातील समभागांना बसला. दिवसअखेर सेन्सेक्स बुधवारच्या तुलनेत ९५.०९ अंशांच्या नुकसानीसह ३८,९९०.९४ या पातळीवर स्थिरावला, तर निफ्टी निर्देशांकाने ७.५५ अंश खाली ११,५२७.४५ या स्तरावर दिवसाला निरोप दिला.

आयसीआयसीआय बँक हा समभाग सेन्सेक्समधील सर्वाधिक नुकसान सोसणारा समभाग ठरला, अ‍ॅक्सिस बँक, कोटक बँक तसेच भारती एअरटेल, पॉवरग्रिड यांनाही मोठी मूल्यऱ्हास सोसावी लागली.

गेले काही दिवस विनिमय मूल्यात निरंतर सुधारणा करणाऱ्या रुपयाच्या मूल्यात गुरुवारी मोठी घसरण दिसून आली. डॉलरच्या तुलनेत ४४ पैसे घसरून रुपयाचे मूल्य दिवसअखेर ७३.४७ पातळीवर घसरले.