अमेरिकी फेडरल रिझव्र्हच्या जैसे थे धोरणाने रिझव्र्ह बँकेला दर कपातीस वाट मोकळी करून दिल्याचे मानत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी भांडवली बाजारात तेजीचा उत्सव साजरा केला. परिणामी सप्ताहअखेरच्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये एकदम २५५ अंशांची भर पडली. चलन बाजारात तब्बल ८० पैशांपर्यंत भक्कम होत असलेल्या रुपयाचेही पडसाद निर्देशांकांत तेजी राखण्यास कारणीभूत ठरले.

शुक्रवारी दोन्ही निर्देशांक एक टक्क्यांनी उंचावले. २५४.९४ अंश वाढीसह सेन्सेक्सने २६,२१८.९१ पर्यंत तर ८२.७५ अंश वाढीसह निफ्टीने ७,९८१.९० पर्यंत मजल मारली. अमेरिकी फेडरल रिझव्र्हच्या गुरुवारी संपलेल्या दोन दिवसांच्या बैठकीत व्याजदर स्थिर ठेवण्याच्या निर्णयाचे येथील प्रमुख भांडवली बाजारांनी सुरुवातीला दमदार उसळीसह स्वागत केले. सेन्सेक्स सकाळच्या व्यवहारातच बुधवारच्या तुलनेत जवळपास ३५० अंशांनी झेपावला. यामुळे तो या वेळी २६,३००च्या पल्याड गेला, तर शतकी वाढीने निफ्टीलाही ८,००० पुढील टप्पा गाठता आला. सेन्सेक्स सत्रात २६,४७१च्या उच्चाकांपर्यंत, तर निफ्टी ८,०५५वर पोहोचला होता. निफ्टीचा हा २८ ऑगस्टनंतरचा सर्वोच्च स्तर होता. मध्यांतरात गुंतवणूकदारांकडून नफेखोरीचा दबाव निर्माण झाल्याने सेन्सेक्सने सत्रातील २६,१३०.३६ या तळही अनुभवला. दिवसअखेर मात्र दोन्ही निर्देशांकांत वाढ राखली गेली. बुधवारी गणेश चतुर्थीनिमित्ताने बाजारात व्यवहार झाले नाहीत.
मुंबई शेअर बाजारात व्याजदराशी निगडित स्थावर मालमत्ता, बँक तसेच आरोग्यनिगा, तेल व वायू क्षेत्रांतील समभाग चमकले. सेन्सेक्सममध्ये स्टेट बँक, एचडीएफीसी बँक, आयसीआयसीआय बँक, महिंद्र अॅण्ड महिंद्र, ल्युपिन, रिलायन्स, हीरो मोटोकॉर्प, विप्रो यांचे मूल्य वाढले.
बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांकही एक टक्क्यापर्यंत वाढले होते. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स ६०८.७० अंशांनी वाढला, तर निफ्टीत द्विशतकी भर पडली.