बाजारातील नफेखोर गुंतवणूकदारांची आर्थिक सर्वेक्षणावर नजर

नव्या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पाची चाहूल देणाऱ्या आर्थिक सर्वेक्षणावर नजर ठेवत भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांना सप्ताहारंभी नफेखोरीचे धोरण अवलंबित प्रमुख निर्देशांकांना किरकोळ घसरण नोंदविण्यास भाग पाडले.

३२.९० अंश घसरणीसह मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी २७,८४९.५६ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी ८.५० अंश घसरण होत प्रमुख निर्देशांक ८,६३२.७५ वर बंद झाला.

२०१७-१८ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प येत्या बुधवारी, १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. तत्पूर्वी, मंगळवारी, ३१ डिसेंबर रोजी संसदेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आर्थिक सर्वेक्षण मांडणार आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्पाची चाहूल देणाऱ्या या आर्थिक सर्वेक्षणाची प्रतिक्षा करत गुंतवणूकदारांनी नव्या सप्ताहाची सुरुवात नफेखोरीने केली. जागतिक भांडवली बाजारातील घसरणीचे सावटही यावेळी बाजारात उमटले.

सेन्सेक्सने गेल्या सलग चार व्यवहारात ८४७.९६ अंशांची वाढ नोंदविली आहे.

सेन्सेक्समधील टाटा मोटर्स, टाटा स्टील यांना घसरणीचा सर्वाधिक, २.१८ टक्क्य़ांपर्यंत फटका बसला. सेन्सेक्समधील ओएनजीसी, स्टेट बँक, हीरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो, एनटीपीसी, टीसीएस, कोल इंडिया, एचडीएफसी बँक, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, महिंद्र अँड महिंद्र, मारुती सुझुकी, हिंदुस्थान यूनिलिव्हर, विप्रो, अदानी पोर्ट्स, अ‍ॅक्सिस बँक यांचेही मूल्य रोडावले. तिमाही नफ्यात १२.८० टक्के वाढ नोंदवूनही एचडीएफसी लिमिटेडचा समभाग ०.१३ टक्क्य़ाने घसरला. सेन्सेक्समधील ३० पैकी १९ समभाग घसरणीच्या यादीत राहिले.

प्रमुख निर्देशांकांमध्ये मूल्य वाढलेल्या ११ समभागांमध्ये आदित्य बिर्ला समूहातील आयडिया सेल्युलरचा समभाग सत्रात २५ टक्क्य़ांहून अधिक वाढला. भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, एशियन पेंट्स, इन्फोसिस, डॉ. रेड्डीज्, ल्युपिन, गेल, एल अँड टी यांचे मूल्य ७.४८ टक्क्य़ांपर्यंत वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन, बँक, सार्वजनिक उपक्रम, ऊर्जा आदी निर्देशांक एक टक्क्य़ापर्यंत घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप निर्देशांक ०.२८ टक्क्य़ाने वाढला तर स्मॉल कॅप निर्देशांक ०.३२ टक्क्य़ांनी घसरला.

सत्रात निफ्टीचा वरचा टप्पा ८,६६२.६० तर किमान स्तर ८,६१७.७५ राहिला.

आशियातील अनेक बाजार आज बंद होते. तर युरोपातील प्रमुख निर्देशांकांची सुरुवात घसरणीने झाली. अमेरिकी अर्थव्यवस्थेतील चौथ्या तिमाहीचे कमकुवत सकल राष्ट्रीय उत्पादनाने आंतरराष्ट्रीय भांडवली बाजार स्तरावर अस्वस्थता निर्माण केली होती.