News Flash

सेन्सेक्स’मध्ये नफेखोरीने ३३० अंशांची घसरण

आठवडय़ात तीन वेळा ४०,५०० पर्यंतचा विक्रमी स्तर गाठणारा मुंबई निर्देशांक या दरम्यान १५८.५८ अंशांनी वाढला आहे

सप्ताहात तीनदा विक्रमी स्तर गाठणाऱ्या सेन्सेक्सने आठवडाअखेर मात्र त्यापासून माघार घेतली. अमेरिकी पतमानांकन संस्थेने भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत दर्जाबदलाद्वारे केलेल्या वर्णनाने भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांनी नफेखोरी केली.

गुरुवारी ४०,५०० पुढील टप्प्यावर विक्रम नोंदविणाऱ्या मुंबई शेअर बाजाराने सप्ताहअखेरच्या व्यवहाराची सुरुवातच किमान स्तरावर केली. सत्रात त्याने ४०,७४९.३३ हा सर्वोच्च टप्पाही गाठला. मात्र सप्ताहअखेर तो ३३०.१३ अंश घसरणीने ४०,३२३.६१ वर थांबला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकाने १०३.९० अंश घसरणीसह ११,९०८.१५ पर्यंत येऊन थांबला. पाच महिन्यांनंतर १२ हजाराला गवसणी घालणाऱ्या निफ्टीने सप्ताहअखेर मात्र वाढत्या समभाग विक्रीदबावाने हा स्तर सोडला.

आठवडय़ात तीन वेळा ४०,५०० पर्यंतचा विक्रमी स्तर गाठणारा मुंबई निर्देशांक या दरम्यान १५८.५८ अंशांनी वाढला आहे. तर निफ्टी या कालावधीत १७.५५ अंश भर नोंदविणारा ठरला आहे. शुक्रवारी भांडवली बाजारावर डॉलरच्या तुलनेत घसरणाऱ्या रुपयाचाही परिणाम राहिला.

गुंतवणूकदारांच्या नफेखोरीने सेन्सेक्समधील सन फार्मा, वेदांता, ओएनजीसी, टीसीएस, हिंदुस्थान यूनिलिव्हर, आयटीसी, एनटीपीसी, एशियन पेंट्स, इन्फोसिस यांचे मूल्य ४.२३ टक्क्यांपर्यंत घसरले. तर अशा वातावरणातही येस बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्र बँक, टेक महिंद्र, एचसीएल टेक आदी मात्र ३.७६ टक्क्यांपर्यंत वाढले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद, तेल व वायू, आरोग्यनिगा, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, ऊर्जा आदी जवळपास २ टक्क्यांपर्यंत घसरले. तर स्थावर मालमत्ता निर्देशांक सलग दुसऱ्या व्यवहारात तेजीत राहिला. त्याचबरोबर बँक, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांकही १.५५ टक्क्यांपर्यंत वाढले.

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक पाऊण टक्क्यापर्यंत घसरले. आशियाई तसेच युरोपीय बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्येही सप्ताहअखेर घसरण राहिली.

रुपयाची ३१ पैशांनी गटांगळी

भांडवली बाजारात निर्देशांक घसरणीबरोबरच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य शुक्रवारच्या व्यवहारात मोठय़ा फरकाने आपटले. गुरुवारच्या तुलनेत स्थानिक चलन ३१ पैशांनी रोडावत ७१.२८ पर्यंत घसरले. परिणामी रुपयाचे मूल्य तीन आठवडय़ाच्या तळात रोडावले आहे. मूडीजने भारताच्या पतमानांकनात केलेल्या गुंतवणूक दर्जा कपातीचे सावट येथेही उमटले. ७१.२६ अशा किमान स्तरावर आठवडय़ाच्या शेवटच्या सत्राची सुरुवात करणारा रुपया व्यवहारात ७१.३३ पर्यंत घसरला. रुपयाचा बंद स्तर हा त्याच्या १६ ऑक्टोबरनंतरच्या किमान स्तरावर पोहोचला आहे. तर सप्ताह तुलनेत स्थानिक चलन तब्बल ४७ पैशांनी आपटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2019 1:13 am

Web Title: market profit decline akp 94
Next Stories
1 खरेदीचा उत्साह कायम
2 दोन दिवसात BSNL च्या २२ हजार कर्मचाऱ्यांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज
3 ‘कडधान्य उत्पादनात आधुनिक व्यापार दृष्टिकोनाचा अंगीकार आवश्यक
Just Now!
X