05 June 2020

News Flash

सेन्सेक्सची ३७६ अंश झेप; निफ्टी ७,९५० नजीक

रिझव्‍‌र्ह बँकेने केलेल्या घसघशीत व्याजदर कपातीचे शेअर बाजाराने दुसऱ्या दिवशीही स्वागत केले.

रिझव्‍‌र्ह बँकेने केलेल्या घसघशीत व्याजदर कपातीचे शेअर बाजाराने दुसऱ्या दिवशीही स्वागत केले. सलग दोन व्यवहारांत ५३८ अंशवाढ राखणाऱ्या मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने बुधवारी तब्बल ३७६.१७ अंशवाढ नोंदविली. तीन आठवडय़ांतील सर्वात मोठय़ा निर्देशांकवाढीने सेन्सेक्स दिवसअखेर २६ हजारांपुढे जाताना २६,१५४.८३ वर स्थिरावला.
व्यवहारात २६,१७९.७० पर्यंत मजल मारणाऱ्या सेन्सेक्सने १.४६ टक्के वाढ राखली, तर शतकाहून अधिक – १०५.६० अंशांची झेप घेत राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,९५० नजीक पोहोचताना ७,९४८.९० वर गेला. चालू आठवडय़ाची सुरुवात सेन्सेक्सने तब्बल ३०० अंश आपटीने केली होती. चालू आर्थिक वर्षांच्या चौथ्या द्विमासिक पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी रेपो दरात थेट अध्र्या टक्क्य़ाची कपात केली होती. बाजाराने मंगळवारच्या व्यवहारातच ३०० अंश आपटीनंतर या निर्णयाचे १६२ अंशांच्या वाढीने स्वागत केले होते.
बुधवारचे बाजाराचे व्यवहार तेजीसहच सुरू झाले. मंगळवारच्या तुलनेत या वेळी तब्बल २६५ अंशांची वाढ झाली. त्यामुळे सेन्सेक्स या वेळी २६ हजारांवर पोहोचला, तर ८० अंशवाढीमुळे निफ्टीनेही याच दरम्यान ७,९०० चा टप्पा पार केला.
मुंबई निर्देशांकाने दिवसअखेर घेतलेली ३७६.१७ अंश झेप ही ९ सप्टेंबरनंतरची सत्रातील सर्वात मोठी ठरली, तर निफ्टी आता ७,९५० नजीक येऊन पोहोचला. व्याजदराशी निगडित समभागांमध्ये बुधवारीही मागणी राहिली.
सेन्सेक्समधील ३० पैकी २४ समभागांचे मूल्य उंचावले. यात भारती एअरटेल, भेल, गेल, कोल इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, आयटीसी, रिलायन्स, बजाज ऑटो, एनटीपीसी यांचा क्रम राहिला.
व्याजदराशी निगडित व मंगळवारी तेजी नोंदविणारे स्टेट बँक व अ‍ॅक्सिस बँक बुधवारी घसरणीच्या यादीत राहिले. सर्वक्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ नोंदली गेली. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक २ टक्क्य़ांपर्यंत वाढले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2015 7:30 am

Web Title: market strength after repo rate cut
Next Stories
1 बँकांचा व्याजदर कपातीचा धडाका
2 अश्विनी कुमार ‘आयबीए’चे नवे अध्यक्ष
3 भारतातील परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला; अमेरिका आणि चीनला टाकले मागे
Just Now!
X