07 July 2020

News Flash

बाजार-साप्ताहिकी : दूरदर्शी उत्साह

डी-मार्ट नाममुद्रेने प्रसिद्ध असलेल्या अ‍ॅव्हेन्यु सुपरमार्टचा आर्थिक वर्षांतील कामगिरीचा आलेख वाढता राहिला आहे.

संग्रहित छायाचित्र

* सुधीर जोशी

उद्योग व जनजीवन सुरळीत होण्याची अनिश्चितता मागे टाकत मासिक सौदापूर्तीच्या या सप्ताहात बाजाराने आकस्मिक उसळी घेतली. बाजाराचा हा उत्साह भारताच्या सद्य परिस्थितीच्या चार पावले पुढेच राहिला.

सकल उत्पादनात घट होण्याचे अंदाज, चीनचे अमेरिका व भारताबरोबरचे तणावाचे संबंध, करोनाची साथ रोखण्यात अजून तरी निराशा यामुळे उद्योगांच्या भवितव्याबाबत कुठलेच आडाखे बांधणे कठीण आहे. तरी बाजार सर्व काही आलबेल होण्याच्या आशेवर जागतिक बाजारांप्रमाणे आशावादी राहिला. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स व निफ्टीत जवळजवळ सहा टक्क्यांची वाढ झाली.

करोना संकटाचा परिणाम झालेल्या परंतु काही दशकांची कामगिरी व अनुभव पाठीशी असणाऱ्या एचडीएफसी व बजाज फायनान्ससारख्या वित्त उद्योगांचे समभाग सध्या व नजीकच्या काळात आकर्षक किमतीमध्ये मिळणार आहेत. गुंतवणूकदारांचा विश्वास, भांडवल व रोकड सुलभता, सचोटी व सुशासनासाठी नावाजलेले प्रवर्तक यामुळे यामध्ये टप्प्याटप्प्याने केलेली गुंतवणूक पुढील दोन वर्षांत चांगला परतावा देईल.

डी-मार्ट नाममुद्रेने प्रसिद्ध असलेल्या अ‍ॅव्हेन्यु सुपरमार्टचा आर्थिक वर्षांतील कामगिरीचा आलेख वाढता राहिला आहे. टाळेबंदीचा कंपनीच्या कामगिरीवर होणारा परिणाम या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत दिसून येईल.

कंपनी तंत्रस्नेही विक्री योजना व घरपोच मागणी पुरवठा करण्याचे धोरण किती परिणामकारकपणे राबवते यावर पुढील यश अवलंबून असेल. कंपनीला दीर्घ मुदतीमध्ये रिलायन्स रिटेलशी सामना करावा लागणार आहे.

करोना संकटामुळे मार्च महिन्यात वितरणावर परिणाम होऊन डाबरच्या शेवटच्या तिमाहीत विक्री व नफ्यात घट झाली. कंपनीच्या आयुर्वेदिक उत्पादनांना सध्या चांगली मागणी असल्यामुळे करोना संकट कंपनीच्या पथ्यावर पडणार आहे.

मारुती सुझुकीच्या शेवटच्या तिमाहीत विक्रीमध्ये घट अपेक्षित होती. एप्रिलमध्ये तर कंपनीने एकही वाहन विकले नाही. गेले काही महिने मंदीतून जाणाऱ्या या उद्योगाला करोनाबाधेचा फटका बसलाच. परंतु करोनापश्चात जगात लोक सार्वजनिक वाहनापेक्षा खासगी वाहनांना प्राधान्य देतील. नवीन मॉडेल्स व  वित्तसंस्थांसोबत ग्राहकांसाठी कर्ज उपल्बधीचा करार करून कंपनी नवीन काळासाठी सज्ज होत आहे. भारतीय बाजारपेठेमधे ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाटा असणाऱ्या या कंपनीमध्ये संधी मिळेल तेव्हा केलेली गुंतवणूक दोन वर्षांत चांगली मिळकत करून देईल.

जगातील सर्वच देश करोना संकटाला गृहित धरून आपले व्यवहार सुरू करण्यासाठी पावले उचलत आहेत. टाळेबंदीचा ग्राहकांच्या सवयींवर मोठा परिणाम झाला आहे व भविष्यातील त्यांच्या वर्तनाचे आडाखे बांधून सर्व उद्योग आपल्या कार्यपद्धतीत बदल करीत आहेत.

गुंतवणूकदारांनीसुद्धा त्याबाबत जागरूक राहायला हवे.  सर्वात मोठा फटका मॉल व सिनेमागृहांना बसला आहे. त्या खालोखाल हॉटेल, पर्यटन, विमान वाहतूक, बांधकाम, लघू उद्योग व परिणामी बुडीत कर्जाच्या धोक्यामुळे बँका आदींना यातून सावरण्यास दोन वर्षांंचा कालावधी लागेल. यामुळे या क्षेत्रांपासून दूरच राहिलेले बरे. माहिती तंत्रज्ञान, शेतीपूरक उद्योग, औषध, विमा, रसायने अशा क्षेत्रांतील कंपन्या पुढील वर्षभरासाठी तुलनात्मकदृष्टया कमी जोखमीच्या वाटतात.

sudhirjoshi23@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 2:06 am

Web Title: market surged this week of monthly deals abn 97
Next Stories
1 सेन्सेक्स ३२ हजारांपार
2 सरकारी कंपन्यांकडून अधिकाधिक धन‘लाभांशा’चा सरकारचा मानस
3 ‘ई-पॅन’चे वितरण
Just Now!
X